Join us  

Tips For Making Bhakri : भाकरी मऊ- लुसलुशीत होण्यासाठी ४ टिप्स; भाकरीही फुगेल पुरीसारखी टम्म...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2022 1:50 PM

Tips For Making Bhakri : भाकरीमध्ये तेल नसल्याने आणि ज्वारी पचायला हलकी असल्याने भाकरी आरोग्यासाठी जास्त चांगली.

ठळक मुद्देगॅसवर टाकल्यानंतर भाकरी पुरीसारखी फुगली तर ती एकसारखी थापली किंवा लाटली गेली असे आपण म्हणू शकतो.भाकरीचा गोळा करुन घेऊन ती चक्क पोळीसारखी पोळपाटावर पीठ घेऊन लाटल्यास ती एकसारखी आणि छान लाटली जाते. 

पोळी, भाकरी हे आपल्याकडे प्रामुख्याने खाल्ले जाणारे पदार्थ. आपल्या जेवणाचा मुख्य भाग असलेली पोळी-भाकरी मऊसूत आणि लुसलुशीत असावी यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करतो. मग त्यासाठी चांगल्या प्रतीचे धान्य आणणे, ते व्यवस्थित दळून आणणे, मग ते चाळून घेणे. पीठ मळताना जास्त वेळ मळून ते काही वेळ ठेवून देणे आणि इतरही अनेक गोष्टी करतो. पोळी-भाकरी चांगली असेल तर ४ घास नक्कीच जास्त खाल्ले जातात (Tips For Making Bhakri). पण हीच पोळी किंवा भाकरी कडक, चिवट असेल तर मात्र जेवायची इच्छाच होत नाही. भाकरीमध्ये तेल नसल्याने आणि ज्वारी पचायला हलकी असल्याने भाकरी आरोग्यासाठी जास्त चांगली. गरमागरम भाकरीसोबत पिठलं, झुणका, पालेभाजी किंवा एखादी छानशी उसळ असली की आणखी काही लागत नाही. 

शहरी भागात प्रामुख्याने गव्हाच्या पोळ्या खाल्ल्या जात असल्याने पोळ्यांची आपल्याला सवय असते. पण भाकरी करायची म्हटली की मात्र आपल्याला टेन्शन येते. भाकरी थापताना ती गोलाकार होण्याबरोबरच ती तव्यावर टाकायची खास कला असते. ही कला एकदा जमली की मग आपणही झटपट चांगल्या भाकरी करु शकतो. ज्वारी, बाजरी, नाचणी तांदूळ अशा वेगवेगळ्या धान्यांपासून तयार केली जाणारी भाकरी आरोग्यासाठी चांगली असते. सतत गहू खाण्यापेक्षा सर्व प्रकारच्या धान्यांचा आहारात समावेश असायला हवा असे आहारतज्ज्ञ सांगतात. आपल्याकडे प्रामुख्याने ज्वारीची आणि तांदळाची भाकरी खाल्ली जाते. थंडीच्या दिवसांत बाजरीही खाल्ली जाते. आता भाकरी करायची तर त्याला चांगला पापुद्रा यायला हवा. भाकरी गार झाली तरी ती मऊसूत राहायला हवी हे खरं आहे. पण त्यासाठी नेमकं काय करायचं हे जाणून घेऊया. 

१. पीठ मळताना

भाकरी चांगली मळली जावी यासाठी भाकरीचे पीठ चांगले मळून घ्यायला हवे. हे पीठ चांगले मळले गेले की ते एकसंध होते आणि त्यामुळे भाकरी सहज थापली किंवा लाटली जाते. यामुळे भाकरी कोरडी किंवा विसविशीत न होता त्याला एकसंधपणा येतो आणि कडांना ती तुटण्याची शक्यताही कमी असते. 

२. कोमट पाणी वापरा

भाकरी तुटू नये किंवा पोळीसारखी एकसारखी व्हावी म्हणून हे पीठ कोमट पाण्यात भिजवल्यास फायदा होतो. गव्हामध्ये ग्लुटेनचे प्रमाण जास्त असल्याने गव्हाची कणीक चिकट असते. मात्र ज्वारी, बाजरी आणि इतर धान्यांतही ग्लुटेनचे प्रमाण कमी असल्याने ते पीठ जास्त कोरडे असते. पण कोमट पाण्याचा वापर केल्यास पीठ एकसंध व्हायला मदत होते आणि भाकरी चांगली थापली जाते. 

(Image : Google)

३. थापायला अवघड पडत असेल तर लाटून घ्या

अनेकदा भाकरी थापणे हा एक टास्क असतो. हाताच्या नेमक्या कोणत्या भागाने भाकरी थापली की ती एकसारखी होईल असा प्रश्न आपल्याला पडतो. मग कधी संपूर्ण तळव्याने तर कधी नुसत्या बोटांनी ही भाकरी थापली जाते. पण काही वेळा भाकरी थापताना खाली पीठ कमी पडल्याने किंवा जास्त जोर दिला गेल्याने भाकरी तुटते किंवा खाली चिकटते. मग ती तव्यावर टाकणे अवघड होते. अशावेळी भाकरीचा गोळा करुन घेऊन ती चक्क पोळीसारखी पोळपाटावर पीठ घेऊन लाटल्यास ती एकसारखी आणि छान लाटली जाते. 

४. भाजताना हे लक्षात ठेवा

भाजणे ही यातील आणखी एक महत्त्वाची क्रिया असून भाकरी भाजण्यासाठी तवा चांगला तापलेला असायला हवा. भाकरीला खालच्या बाजुने पीठ असल्याने वरुन थोडा पाण्याचा हात फिरवल्यास पीठ पीठ राहत नाही. वरच्या बाजूने भाकरी कोरडी दिसायला लागली की मग दुसऱ्या बाजुने ती बारीक गॅसवर एकसारखी भाजावी. गॅसवर टाकल्यानंतर भाकरी पुरीसारखी फुगली तर ती एकसारखी थापली किंवा लाटली गेली असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुन्हा तव्यावर भाजलेली बाजू थोडी गॅसवर भाजून घ्यायची.   

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.