घरी जर एखादा खास कार्यक्रम किंवा फंक्शन असेल तर आपण बासमती तांदुळ वापरतो. बिर्याणी, पुलाव असे भाताचे खास पदार्थ तयार करायचे म्हटल्यावर बासमती तांदूळ हवाच. बासमती तांदूळ जर अगदी व्यवस्थित शिजून तयार झाला तरच तो दिसायला चांगला आणि चवीला उत्तम लागतो. नेहमीच्या वापरातील तांदूळ आणि बासमती तांदूळ शिजवण्याची पद्धत जरी सारखी असली तरी तो शिजवताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते(Tips For Perfectly Cooking Basmati Rice).
बासमती तांदूळ काहीवेळा प्रमाणापेक्षा जास्त शिजून त्याचा लगदा होतो तर कधी न शिजता कच्चाच राहतो. असा लगदा झालेला किंवा दडदडीत भात खायला कुणालाच आवडत नाही शिवाय अशा भाताचे पदार्थ तयार केले तर ते फसतात आणि त्याची चव देखील बिघडते. असे होऊ नये म्हणून बासमती तांदूळ शिजवताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. या लहान - सहान गोष्टी लक्षात ठेवल्या तर बासमती तांदूळ शिजवताना काहीच अडचण येणार नाही, याचबरोबर बासमती तांदूळ परफेक्ट शिजून तयार होईल. बासमती तांदूळ शिजवताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते पाहूयात(How To Cook Basmati Rice Perfectly).
बासमती तांदूळ शिजवताना विसरुच नका ४ गोष्टी...
१. बासमती तांदूळ शिजवण्यापूर्वी अर्धा तास आधी भिजत ठेवा.
अनेकवेळा आपण बासमती तांदूळ शिजवताना एक कॉमन चूक करतो ती म्हणजे बासमती तांदूळ भिजत ठेवत नाही. खरंतर बासमती तांदुळाचा प्रत्येक दाणा लांब आणि मोकळा शिजवून घेण्यासाठी तो शिजवण्यापूर्वी अर्धा तास आधी भिजत ठेवा. बासमती तांदूळ पाण्यात भिजत ठेवल्याने त्याचे पातळ आणि लांब दाणे शिजताना तुटण्यापासून रोखले जातात. बासमती तांदूळ धुताना जोपर्यंत तांदूळ धुतल्याचे पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत ३ ते ४ वेळा हे तांदूळ धुवून घ्यावेत. बासमती तांदूळ शिजवण्यापूर्वी अर्धा तास भिजत ठेवल्याने तांदुळाचे दाणे एकसमान रुपात शिजण्यास मदत होते.
ऐन थंडीत करा पिवळ्या धम्मक मक्याचे पराठे, मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक पदार्थ-एक काय चार खा बिंधास्त!
२. बासमती तांदूळ शिजवताना पाण्याचे प्रमाण योग्य असावे.
बासमती तांदूळ अगदी परफेक्ट शिजवण्यासाठी तांदूळ शिजवताना पाण्याच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष द्यावे. पाण्याचे प्रमाण योग्य असेल तरच हा बासमती तांदूळ अगदी व्यवस्थित शिजतो. जर आपण एक कप बासमती तांदूळ शिजवत असाल तर दिड ते दोन कप पाणी घ्यावे. बासमती तांदुळ शिजवण्यापूर्वी जर तो पाण्यांत भिजवून घेतला असेल तर तो शिजवताना जास्त प्रमाणांत पाण्याचा वापर करु नये. शिजवण्यापूर्वी बासमती तांदूळ जर भिजवत ठेवला असेल तर असा तांदुळ पाणी लगेच शोषून घेतो यासाठी बासमती तांदूळ शिजवताना कमी पाण्याचा वापर करावा.
३. बासमती तांदूळ शिजवण्याआधी पाणी चांगले उकळवून घ्यावे.
बासमती तांदूळ शिजवताना पाणी आणि तांदूळ एकत्रित एका भांडयात घालून शिजवण्याची चूक करु नये. सर्वात आधी भांड्यात पाणी घेऊन ते पाणी चांगले उकळवून घ्यावे. पाण्याला एक उकळी आल्यावरच मग त्यात बासमती तांदूळ घालावा. पाणी चांगले उकळून आले की गॅसची फ्लेम कमी करून मग त्यात तांदूळ घालावा. त्यानंतर कुकरचे झाकण अगदी घट्ट बसवून बासमती तांदूळ शिजवून घ्यावा. या ट्रिकचा वापर केल्याने बासमती तांदुळाचा लगदा न होता प्रत्येक दाणा मोकळा होऊन अगदी व्यवस्थित शिजतो.
बटाटे नीट उकडत नाहीत? पाहा 'ही' योग्य पद्धत, हातही न लावता सोला बटाटे झटपट
४. बासमती तांदूळ शिजल्यानंतर लगेच कुकरचे झाकण उघडू नका.
बासमती तांदुळ आपण शक्यतो कुकरमध्ये किंवा मोठ्या टोपात शिजवतो. बासमती तांदूळ शिजल्यानंतर लगेच कुकर किंवा टोपावरील झाकण काढू नये. शिजवून घेतलेल्या तांदूळ थोडा वेळ तसेच झाकून ठेवून रेस्ट करु द्यावे. तांदूळ शिजल्यावर ५ ते १० मिनिटांसाठी तो तसाच झाकून ठेवावा. यामुळे भात व्यवस्थित शिजून त्याचा प्रत्येक दाणा मोकळा होतो.