Join us  

बटाट्याचे पापड खुसखुशीत होण्यासाठी ४ टिप्स, बटाट्याचे पापड कडक होत असतील, फुलत नसतील तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 5:41 PM

Tips To Follow While Making Aloo Papad At Home : बटाट्याचे पापड तोंडात टाकताच विरघळले पाहिजे, पापड कडक होत असतील तर पाहा काय करायचे..

उन्हाळा म्हटलं की सगळ्यांना वेध लागतात ते वाळवणाचे. उन्हाळ्यात आपल्या सगळ्यांच्याच घरात वाळवण घातली जातात. उन्हाळ्यांत वाळवण घालण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती तयारीला लागलेलं असायचं. उन्हाचे चटके बसू नयेत किंवा वाळवणाला चांगलं ऊन मिळावं म्हणून हे सगळे पदार्थ सकाळी लवकर उठून केले जातात. कारण ऊन वाढलं की पायाला चटके बसतात. मग वाळवणं घालायला त्रास होतो. शिवाय उशिरा वाळवण घातलं की मग त्यांना ऊनही कमी लागतं. असा सगळा घाट घालून वाळवण केली जातात. या वाळवणामध्ये बटाट्याचा किस, पापड, मसाले, लोणची, कुरडया, फेण्या, वड्या, मिरच्या, शेवया यांसारख्या अनेक पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ उन्हाळ्यात बनवून वर्षभर साठवून आपल्याला हवे तेव्हा तळून जेवणासोबत खाल्ले जातात. 

पूर्वी उन्हाळा आला की, साठवणीचे पदार्थ करण्याची घरी लगबग असायची. परंतु आता फार कोणी वाळवणीचे पदार्थ घरी करायला पाहात नाही. कारण ते बाहेर रेडिमेड मिळतात. आपल्यापैकी काहींच्या घरात आजही वाळवण तयार केली जातात. ही वाळवण म्हणजे पुढच्या वर्षभरासाठी केली जाणारी साठवणूक असते. त्यामुळे हे वाळवणाचे पदार्थ वर्षभर टिकण्यासाठी ते बनवताना खूप काळजी घ्यावी लागते. नाहीतर हे पदार्थ हवे तसे नीट बनत नाहीत किंवा लगेच खराब होतात. तसेच काहीवेळा हे वाळवणाचे पदार्थ व्यवस्थित साठवले नाहीत तरी लगेच बुरशी लागून खराब होतात. या वाळणाच्या पदार्थांमध्ये सगळ्यांच्या घरी हमखास बनणारा पदार्थ म्हणजे बटाट्याचे पापड. हे पापड तयार करताना कोणती खबरदारी घ्यावी ते समजून घेऊयात(Tips To Follow While Making Aloo Papad At Home). 

बटाट्यांचे पापड बनवतांना कोणती काळजी घ्यावी ? 

१. पापड बनवतांना बटाट्यांची योग्य निवड :- वर्षभर चांगले टिकणारे बटाट्याचे पापड तयार करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या बटाट्यांची निवड करणे देखील तितकेच महत्वाचे असते. जर आपण योग्य दर्जाच्या बटाट्यांची निवड केली नाही तर पापड बनवताना ते फसू शकतात किंवा साठवून ठेवताना खराब होऊ शकतात. बटाट्याचे पापड बनवताना चिप्सोना जातींच्या बटाट्याची निवड करावी. बटाट्याचे पापड बनवताना चिप्सोना जातींच्या बटाट्यांची निवड केल्यास पापड चांगले कुरकुरीत होतात व वर्षभर चांगले टिकतात. चिप्सोना जातींच्या बटाट्यांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्याकारणाने हे बटाटे उकडून त्यांच्यापासून वर्षभर टिकणारे पापड बनवणे सोपे जाते.

२. बटाटा कच्चा नसावा :- पापड बनवताना बटाटा कच्चा नसावा याची खात्री करुन घ्यावी. पापड बनवताना सहसा आपले या गोष्टीकडे दुर्लक्ष होते परंतु बटाटा कच्चा नसावा ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी. बऱ्याचदा बटाट्याचे पापड बनवताना आपण घाई - घाईत बटाटे उकळवून घेतो. अशा परिस्थिती काहीवेळा बटाटे चांगले उकळले जात नाहीत. पापड बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, पापडासाठी बटाटे उकळवून घेताना तो आतून कच्चा राहणार नाही याची खात्री करुन घ्यावी. जर हा बटाटा आतून कच्चा राहिला असेल तर असा बटाटा किसताना त्याचा किस व्यवस्थित निघणार नाही. यामुळे बटाट्याचा किस व्यवस्थित न निघाल्यामुळे बटाट्याचे पापड चांगले बनणार नाहीत. तसेच बटाटा कच्चा राहिल्यास त्यात आपण जे इतर जिन्नस घालतो ते नीट एकजीव होत नाहीत यामुळे पापडांची चव बिघडू शकते. 

३. बटाट्यांना पाण्यांतून काढून घ्यावे :- बटाट्यांचे पापड बनवतांना आपण सर्वप्रथम बटाटे पाण्यांत उकळवून घेतो. प्रेशर कुकरमध्ये पाणी घालून बटाटे उकळून घेतल्यानंतर, कुकर थंड झाल्यावर त्यातील पाणी काढून घ्यावे. त्यानंतर बटाटे थोडा वेळ असेच एका गाळणीत ठेवून त्यांतील अतिरिक्त पाणी निथळून जाऊ द्यावे. लक्षात ठेवा बटाटे थोडे हलकेच वाळून थंड झाल्यावरच त्यांचा किस पाडून घ्यावा किंवा मॅश करुन घ्यावेत. यामुळे पापड चांगले बनतात.  बटाटे चांगले उकळवून झाल्यानंतर त्यातील सगळेच पाणी काढून टाकावे, बटाट्यांना हलकेच वाळू द्यावे. असे केल्याने पापड चांगले बनतात. 

कच्च्या कैरीची घरीच पटकन बनवा आंबटगोड कॅण्डी, तोंडाला पाणीच सुटेल असा मस्त पदार्थ...

४. मीठ घालण्याची योग्य वेळ :- पापड बनवताना त्यात मीठ कधी घालावे याची योग्य वेळ असते. परंतु आपण या लहानश्या गोष्टीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करतो. हे पापड बिघडण्याचे एक मुख्य कारण असू शकते. आपल्यापैकी बऱ्याच गृहिणी बटाटा उकळवून किसल्यानंतर किंवा मॅश केल्यावर त्यात लगेच मीठ घालतात. परंतु हे संपूर्णपणे चुकीचे आहे. जर बटाटे थोडे गरम आहेत त्यातून वाफ येत आहे आणि अशातच आपण मीठ घातले तर त्या बटाट्याच्या मिश्रणाला पाणी सुटू शकते. यामुळे पापडाचे मिश्रण सैल पडून गरजेपेक्षा अधिक मऊ पडते. परिणामी आपल्याला पापड लाटता येत नाहीत किंवा मिश्रण फारच ओलसर लागते. या ओलसर मिश्रणाचे पापड बनवणे खूपच कठीण जाते.

टॅग्स :अन्नपाककृती