आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात नेहमी आलं असतंच. आल्याचा वापर आपण रोजच्या जेवणात करतो. सकाळचा चहा असो किंवा कोणतीही भाजी, आमटी यात आपण आल्याचा वापर करतोच. स्वयंपाकात आल्याचा वापर केल्यास पदार्थाला आणखीनच चव येते. कोणत्याही पदार्थाचा तिखटपणा वाढवायचा असेल किंवा चटपटीत, झणझणीत पदार्थ करायचा असेल तर हमखास आपण आल्याचा वापर करतो. आल्याची पेस्ट, आल्याचे तुकडे, किसलेलं आलं अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण आलं जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी वापरतो. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असणाऱ्या आल्याचा वापर निरनिराळ्या पद्धतीने केला जातो. आल्याचा वापर फक्त जेवण रुचकर बनवण्यासाठीच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत(Tips to follow while using ginger in cooking).
रोजच्या आहारात आल्याचा समावेश केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. याचबरोबर उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास आलं रोजच्या आहारात आवर्जून वापरावे. आल्यामध्ये अँटी - इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत मिळते. आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मायक्रोबियल, कार्डियोटोनिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आपण वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थांमध्ये आल्याचा वापर करतो परंतु आल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला मिळावे यासाठी आलं वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवूयात(Tips You Need For Cooking With Ginger).
आल्याचा वापर करताना लक्षात ठेवा...
१. नेहमी ताजे आलं वापरावे :- जर तुम्ही रोजच्या जेवणात आल्याचा वापर करत असाल तर नेहमी ताजे आलं वापरावे. आपल्या रोजच्या जेवणाला जर अप्रतिम चव आणायची असेल तर कायम ताज्या आल्याचा वापर करावा. वाळलेल्या किंवा पावडर केलेल्या आल्याऐवजी नेहमी ताजे आले निवडण्याचा प्रयत्न करा. ताज्या आल्यामध्ये जिंजरॉलचे प्रमाण हे अधिक असते, ज्यामध्ये दाहक - विरोधी आणि अँटी - ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. हे पदार्थांना अधिक रुचकर आणि सुंदर असा सुगंध देतात यामुळे त्या पदार्थाची चव देखील छान लागते.
२. किसलेल्या आल्याचा वापर करावा :- जर तुम्हाला तुमच्या पदार्थांची चव अधिक उत्तम करायची असेल तर किसलेल्या आल्याचा वापर करावा. किसलेल आलं कोणत्याही पदार्थांमध्ये अगदी सहजरित्या मिसळून जाते. आलं जितकं त्या पदार्थांमध्ये चांगलं मिसळेल तितकीच त्या पदार्थांची चव अधिक छान होते. किसून घेतलेलं आलं दुप्पट प्रमाणात रस सोडते त्यामुळे आल्यातील रस पदार्थांत लगेच मिसळतो यामुळे पदार्थांना चांगली चव येते. यामुळे पदार्थांची चव आणि सुगंध या दोन्हींत अधिक भर पडते.
३. पदार्थांत आलं घालण्याची योग्य वेळ :- साधारणपणे आपण कोणत्याही पदार्थांत आलं घालताना ते सुरुवातीला फोडणीतच घालतो. परंतु असे न करता आपल्याला त्या पदार्थांत आल्याची चव कशी हवी आहे हे ओळखून मगच त्या पदार्थांत आलं घालावं. कोणत्याही पदार्थांत आल्याचा समावेश त्याच्या स्वादाच्या तीव्रतेनुसार करावा. जसे की, जर तुम्हाला आल्याची सौम्य चव हवी असेल तर ते शिजवताना सुरुवातीला घाला. त्याच वेळी, जर तुम्हाला आल्याची मसालेदार चव हवी असेल तर शेवटी घाला. अशा प्रकारे, आपण पदार्थांत आलं घालण्याची योग्य वेळ लक्षात घेऊन मग चवीनुसार आलं घालावं.
रात्री उरलेल्या शिळ्या पुऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळीही राहतील ताज्या - मऊ, ४ सोप्या टिप्स...
४. आले व्यवस्थित स्टोअर करा :- आल्याचा आपण रोज वापर करतो त्यामुळे ते व्यवस्थित स्टोअर करून ठेवणे देखील तितकेच गरजेचे असते. आले दीर्घकाळ ताजे राहावे आणि खाताना त्याची उत्तम चव लागावी यासाठी आले योग्य प्रकारे स्टोअर करणे महत्त्वाचे असते. आलं रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यापूर्वी, पेपर किंवा टॉवेलमध्ये गुंडाळा आणि प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा. यामुळे, आले लवकर सुकत नाही आणि प्रत्येकवेळी खाल्ल्यावर त्याची एक अप्रतिम चव लागते.