Lokmat Sakhi >Food > रोज रात्री कोरडी कोरडी भाजी पोळी खाऊन कंटाळलात? ६ हेल्दी रेसिपी, डिनर होईल सेट!

रोज रात्री कोरडी कोरडी भाजी पोळी खाऊन कंटाळलात? ६ हेल्दी रेसिपी, डिनर होईल सेट!

थंडीच्या दिवसांत रात्रीच्या वेळी ताटात गरमागरम आणि वेगळे काहीतरी असावे असे आपल्याला वाटते, त्यासाठी काही खास पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 01:48 PM2021-11-22T13:48:12+5:302021-11-22T13:50:29+5:30

थंडीच्या दिवसांत रात्रीच्या वेळी ताटात गरमागरम आणि वेगळे काहीतरी असावे असे आपल्याला वाटते, त्यासाठी काही खास पर्याय...

Tired of eating dry vegetables and roti every night? 6 Healthy Recipes, Dinner Will Be Set! | रोज रात्री कोरडी कोरडी भाजी पोळी खाऊन कंटाळलात? ६ हेल्दी रेसिपी, डिनर होईल सेट!

रोज रात्री कोरडी कोरडी भाजी पोळी खाऊन कंटाळलात? ६ हेल्दी रेसिपी, डिनर होईल सेट!

Highlightsसारखी पोळीभाजी नको असेल तर रात्रीच्या जेवणासाठी ट्राय करा हे पदार्थ मुलांना आवडतील आणि पौष्टीक पदार्थ थोडे नियोजन केले तर झटपट होतात

सतत पोळीभाजी खाऊन घरातल्या सगळ्यांनाच कंटाळा येतो. लहान मुलेही पोळी-भाजी पुढे दिली की नाक मुरडतात. दुपारी एकदा पोळी-भाजी खाल्ली की रात्रीच्या वेळी तोच स्वयंपाक करायचा आणि खायचा म्हणजे जीवावरच येते. सध्याकाळी चहासोबत काही खाणे झाले असेल तर रात्री म्हणावी तशी भूकही नसते. अशावेळी काही वेगळा टेस्टी पदार्थ केल्यास सगळेच आवडीने खातात आणि हेल्दी असल्याने आरोग्याला काही त्रास व्हायचाही प्रश्न राहत नाही. आता वेगळे आणि तरीही हेल्दी पदार्थांचे पर्याय काय असू शकतात हे जाणून घेऊया...

१. थालिपीठ - थालिपीठ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर भाजणीे खमंग थालिपीठ येते. भाजणी असेल तर हे थालिपीठ तुम्ही जेवायला करु शकता. कांदा, कोथिंबीर घातलेले हे थालिपीठ तीप, दही, लोणचे यांबरोबर छान लागते. थालिपीठ दमदमीत असल्याने जेवणाच्यादृष्टीने पोटही व्यवस्थित भरते. पण घरात भाजणी नसेल तर गहू, ज्वारी, बाजरी, बेसन ही पीठे एकत्र करुनही तुम्ही मस्त थालिपीठ बनवू शकता. यामध्ये धने-जीरे पावडर, तिखट, मीठ, कांदा, कोथिंबीर घातले की अगदी छान थालिपीठ होतात. 

(Image : Google)
(Image : Google)

२. धिरडी - यामध्ये तुम्हाला असंख्य पर्याय करता येऊ शकतात. लहान मुलांना योग्य ते पोषण मिळावे यासाठी तुम्ही नाचणीची धिरडी करु शकता. तसेच गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ अशा तुम्हाला हव्या त्या पिठांची धिरडी करता येऊ शकतात. धिरड्याचे पीठ भिजवताना मुख्य जे पीठ आहे त्यात चमचाभर दही, बारीक रवा आणि तांदळाचे पीठ घातल्यास ही धिरडी कुरकुरीत व्हायला मदत होते. तसेच तुम्हाला आवडत असेल तर लसूण, टोमॅटो, कोथिंबीर किंवा किसलेले गाजर, बीट अशा भाज्याही तुम्ही यामध्ये घालू शकता. तसेच धिरड्यात ओवा घातल्याने त्याला छान स्वादही येतो आणि पोटाच्या तक्रारींसाठीही ओवा अतिशय फायदेशीर असतो. 

३. दलिया - गव्हाचा दलिया चवीला अतिशय उत्तम लागतो आणि पौष्टीकही असतो. घरात ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या बारीक चुरुन यामध्ये घातल्यास पौष्टीकतेत आणखी भर पडते. तुम्हाला आवडत असतील तर दाणेही घालू शकता. हा दलिया आधी कुकरला शिजवून घेऊन मग फोडणीत भाज्या घालून त्यात दलिया घालावा. हल्ली बाजारात गव्हाचा दलिया अगदी सहज उपलब्ध असतो किंवा तुम्हीही गिरणीतून जाडसर गहू दळून आणू शकता. गव्हासारखाच ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि सगळ्या डाळी भाजून त्या जाडसर दळून आणल्यास त्याचाही दलिया छान लागतो. याला लसणाची फोडणी दिल्यास त्याचा स्वाद आणखी वाढतो. थंडीच्या दिवसांत रात्रीच्या वेळी असे गरमागरम पदार्थ मस्त लागतात. यासोबत कोशिंबीर, पापड घेऊन तुम्ही जेवणाची लज्जत आणखी वाढवू शकता. 

(Image : Google)
(Image : Google)

४. भाताचे प्रकार - रात्री बऱ्याचदा कंटाळा आला की खिचडीचा पर्याय असतोच. पण यामध्ये थोडे बदल केल्यास घरच्यांनाही त्याचा कंटाळा येणार नाही. यामध्ये तुम्ही मसूर भात, सोयाबिन भात, वालाचा भात, भाज्या घालून पुलाव, पालक राईस, कोबी राईस असे पर्याय करु शकता. आलं-मिरची लसूण पेस्ट घालून आवडीनुसार कांदा टोमॅटो आणि खडा मसाला घातल्यास कोणत्याही प्रकारच्या भाताला छान चव येते. या गरमागरम भातासोबत कधी आमसूलाचे कधी टोमॅटोचे सार केल्यास त्याची मज्जा आणखी वाढते. 

५. मिश्र डाळींचे डोसे - डोसे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर तांदळाच्या पीठाचे डोसे येतात. पण डाळी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असा घटक आहे. प्रथिनांचा उत्तम स्रोत असलेल्या डाळी आहारात आवर्जून खायला हव्यात. दुपारी मूग, मसूर, हरबरा आणि थोडी तूर डाळ भिजत घालायची. संध्याकाळी त्या मिक्सरमधून वाटून त्यात जीरे, लसूण आणि मीरची घायालची. चवीपुरते मीठ घालून डोसे घालायचे. हे डोसे चवीला अतिशय सुंदर लागतात आणि लहान मुलेही आवडीने खातात. यासोबत चिंचेची किंवा खोबऱ्याची चटणी किंवा अगदी स़सही मस्त लागतो. असेच हिरव्या मूगाचेही डोसे करता येतात.  

६. भाज्यांचे कटलेट - बीट, गाजर, कॉर्न, बटाटा, कांदा, फरसबी, कोबी यांसारख्या घरात उपलब्ध असतील त्या भाज्या एकत्र करुन त्यात आलं मिरची लसूण पेस्ट घालावी. शक्यतो या भाज्या किसून उकडून घ्याव्यात. मीठ आणि धनेजीरे पावडर, लिंबू  घालावे. हे मिश्रण चिकट झाले असे वाटल्यास त्यात ब्रेडचा चुरा करुन घालावा. याचे गोल कटलेट थापून ते रव्यात घोळून शॅलो फ्राय करावेत. हे कटलेट नुसते चटणी किंवा सॉससोबत चांगले लागतातच पण पोळी किंवा ब्रेडमध्ये घालूनही तुम्ही ते खाऊ शकता. 

Web Title: Tired of eating dry vegetables and roti every night? 6 Healthy Recipes, Dinner Will Be Set!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.