पत्ता कोबीची भाजी खूप चविष्ट लागते. त्याची भाजी विविध पद्धतीने बनवली जाते. जर आपल्याला पत्ता कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर आपण या पत्ता कोबीपासून कॅबेज रोल बनवू शकता. झटपट, चविष्ट आणि बनवायला सोपी ही रेसिपी पौष्टिक आहे. संध्याकाळची छोटी भूक भागवण्यासाठी पत्ता कोबी रोल उत्तम स्नॅक्स ठरेल. आपण ही रेसिपी आपल्या लहान मुलांच्या टिफीनसाठी देखील बनवून देऊ शकता. चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची पाहुया.
कॅबेज रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य
पत्ता कोबी - १
उकडलेले बटाटे - ३
उकडून घेतलेले मटार - १ वाटी
बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची - १ वाटी
टॉमेटो - १
लसूण
कांदा - १
आलं
जिरं - अर्धा चमचा
तिखट पावडर
पुदिना
साखर
मीठ
तेल
कृती
सर्वप्रथम कोबीची 8 ते 10 पाने काढा. एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात कोबीची पाने आणि अर्धा चमचा साखर टाकून पाने मऊ होईपर्यंत शिजवा. पाने मऊ झाल्यावर बाहेर काढून थंड पाण्यात टाका. आता मिक्सरच्या भांड्यात चिरलेला टोमॅटो, आले, लसूण आणि थोडे मीठ टाकून बारीक करून पेस्ट बनवा. यानंतर कढईत २-३ चमचे तेल टाकून त्यात जिरे टाकून मध्यम आचेवर गरम करा.
त्यात बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि उकडलेले वाटाणे घालून शिजवा. सर्व साहित्य मऊ झाल्यावर त्यात उकडलेले बटाटे मॅश करून सर्व साहित्य थोडा वेळ भाजून घ्या. आता एक उकडलेले कोबीचे पान घेऊन त्यात सारण घालून रोल बनवा. अशा प्रकारे कॅबेज रोल खाण्यासाठी रेडी.