दुपारी पोळी-भाजी खाल्ली की आपल्याला परत रात्री पोळी खायचा कंटाळा येतो. मग अशावेळी गरमारम मूगाच्या डाळीची खिचडी, भरपूर भाज्या घातलेला पुलाव किंवा भाताचा आणखी कोणता प्रकार खायला छान वाटतो. वेगळं काही नाही तरी वाफाळता आमटी-भात तर आपल्या सगळ्यांच्या आवडीचा. पण सतत भाताचे तेच ते प्रकार खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल आणि वेगळं काही ट्राय करायचं असेल तर टोमॅटो राईस हा उत्तम पर्याय ठरु शकतो. साऊथ इंडियन पदार्थ म्हणून प्रसिद्ध असलेला हा गरमागरम आंबट-गोड चवीचा टोमॅटो राईस केला तर सोबत काहीच नसेल तरी चालते. लहान मुलांपासून ते घरातील ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळ्यांनाच हा भात नक्की आवडेल. झटपट होणारी ही सोपी रेसिपी नक्की करुन पाहा...
साहित्य -
१. कांदा - १ २. आलं - लसूण पेस्ट - १ चमचा३. कडिपत्ता - ५ ते ६ पाने ४. टोमॅटो - ४ ५. बटाटा - १६. गाजर, ढोबळी, मटार - उपलब्ध असेल ते आवडीनुसार७. बासमती तांदूळ - १ ते १.५ वाटी ८. तूप - २ चमचे९. कोथिंबीर - अर्धी वाटी चिरलेली१०. दालचिनी, तमालपत्र, मोहरी, हिंग , हळद - फोडणीसाठी११. काजू - १० १२. तिखट, गोडा मसाला, धने-जीरे पावडर - प्रत्येकी १ चमचा १३. साखर - १ चमचा
कृती -
१. कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तूप घालून मोहरी, दालचिनी, तमालपत्र घालून चांगले गरम होऊ द्यावे.
२. त्यानंतर यामध्ये हिंग, हळद, कडीपत्ता घालून आलं-लसूण पेस्ट आणि चिरलेला कांदा चांगला परतून घ्यावा.
३. यामध्ये चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी, इतर भाज्या, तिखट, गोडा मसाला, धने-जीरे पावडर सगळे घालून ५ मिनीटे झाकण ठेवून शिजवून घ्या.
४. यामध्ये २ कप पाणी घालून धुतलेला तांदूळ घाला आणि मीठ घालून चांगले शिजू द्या. टोमॅटो आंबट असल्याने चवीपुरती एक चमचा साखर घाला.
५. भात शिजल्यानंतर त्यावर तळलेले काजू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.