Join us  

शिरा -उपमा खाऊन कंटाळला, करा रव्याचे 3 झटपट पदार्थ - नाश्ता पोटभर-मूड खुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 5:27 PM

रवा तोच पण त्यापासून करा ब्रेकफास्टसाठी हटके आणि चविष्ट पदार्थ

ठळक मुद्देसारखे तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर ट्राय करा या सोप्या रेसिपी रव्यापासून करा ३ हटके पदार्थ, खाताच घरातले होतील एकदम खुश

सकाळच्या नाश्त्याला काय करायचे असा एक मोठा प्रश्न महिला वर्गापुढे असतो. सतत पोहे, उपमा, शिरा, साबुदाण्याची खिचडी हे पदार्थ करुन आणि खाऊनही कंटाळा येतो. अशावेळी घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासूनच थोडे वेगळे आणि हटके पदार्थ करता आले तर? यामुळे घरातील मंडळी तर खूश होतातच पण आपल्यालाही काहीतरी वेगळं केल्याचा आनंद मिळतो. सकाळचा नाश्ता पोटभर झाला की दुपारी उशीरापर्यंत चिंता नसते. पहिल्या टप्प्यात आपला मूड फ्रेश राहीला तर कामही चांगले होते आणि एकूण दिवसही चांगला जातो. रवा हा आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपैकी एक. आता या रव्यापासून नेहमीचे तेच तेच पदार्थ करण्यापेक्षा थोडे हटके आणि चविष्ट पदार्थ करता आले तर....

१. रव्याचा ढोकळा

१ वाटी रव्यामध्ये अर्धा वाटी दही, जीरे, मिरची वाटून आणि चवीपुरती मीठ आणि साखर घालावी. यामध्ये अर्धा चमचा इनो किंवा खायचा सोडा घालून त्यावर थोडेसे पाणी घालावे. हे सगळे एकसारखे हलवून १५ मिनीटांसाठी तसेच झाकून ठेवावे. कुकरच्या दोन डब्यांना तेल लावून त्यामध्ये हे मिश्रण ओतावे आणि एकसारखे करावे. कुकरला शिट्टी न लावता १५ ते २० मिनीटे वाफ येण्यासाठी ठेवावे. त्यानंतर गॅस बंद करुन हे थोडे गार होऊ द्यावे. एकसारखे चौकोनी काप करुन घ्यावेत. एका लहान कढईमध्ये तेल, मोहरी, जीरे, कडिपत्ता आणि हिरवी मिरची यांची फोडणी करुन ती या ढोकळ्यावर घालावी. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीरही घालावी. प्लेटमध्ये सगळ्यांना खायला द्यावे. हे गरमागरम ढोकळे छान फुलतात. 

(Image : Google)

२. रव्याचे आप्पे

आप्पे हा पदार्थ आपल्याकडे अतिशय आवडीने खाल्ला जातो. छोटे छोटे आप्पे चटणीसोबत किंवा सोबत काही नसेल तरी छान लागतात. आपण इडलीच्या पिठाचे आप्पे करतो पण रव्याचे आप्पे फारसे करत नाही. पण रव्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ, दही, कांदा, जीरे मीठ, साखर घालून त्याचे आप्पे केले तर ते अतिशय छान लुसलुशीत आणि मस्त होतात. यामध्ये आपण गाजर, कोबी, बीट अशा कोणत्याही भाज्या किसून घालून मुलांना देऊ शकतो. हे आप्पे सॉस, हिरवी चटणी, चिंचेची चटणी अशा कशासोबतही छान लागतात. 

(Image : Google)

३. रव्याचे डोसे 

ह़ॉटेलमध्ये आपण रव्याचा डोसा किमान १०० किंवा १५० रुपयांना खातो. पण घरच्या घरी रवा, दही, पाणी, मीठ आणि जीरे घातलेला रवा डोसा अतिशय झटपट आणि कमी खर्चात होतो. गरमागरम कुरकुरीत होणारा हा डोसा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. नाश्त्याला रवा डोसा हा पोटभरीचा आणि उत्तम पर्याय ठरु शकतो. 

(Image : Google)

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.