दुपारच्या जेवणात आपण पोळीभाजीचा डबा नेत असलो तरी रात्रीच्या जेवणात मात्र आपल्याला आमटी लागतेच. भाजी, कोशिंबीर ताटात असली तरी ओले काहीतरी म्हणून आमटी हा अनेक घरात जवळपास रोज केला जाणारा पदार्थ. गरमागरम भाताबरोबर चविष्ट आमटी असली की आपल्याला दुसरे काहीच लागत नाही. एखादवेळी साधंवरण किंवा फोडणीचं वरण ठिक वाटतं. पण जेवणाला चव येण्यासाठी गरमागरम आमटी असेल तर बाकी काही लागत नाही. आमटी चविष्ट असेल तर अनेकदा पोळीही आपण आमटीमध्ये कुस्करुन खाऊ शकतो. आमटी डाळीपासून केली जात असल्याने त्यातून शरीराला प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे लहान मुलांना तर आपण आवर्जून आमटी खायलाच लावतो. आता रोज त्याच त्या पद्धतीची फोडणी देऊन आमटी केली की खाणाऱ्यांना आणि आपल्याला करायलाही कंटाळा येतो. अशावेळी याच आमटीला थोडा वेगळ्या पद्धतीने तडका दिला तर ४ घास जास्तच खाल्ले जातात. पाहूया आमटीच्या काही आगळ्यावेगळ्या रेसिपी...
१. कैरीची आमटी
आमटी म्हटली की त्याला थोडी आंबट-गोड चव असेल तर ती आणखी छान लागते. सध्या आंब्याचा सिझन असल्याने बाजारात भरपूर कैऱ्या उपलब्ध आहेत. अनेकदा आपण कैऱ्या आणल्या की त्याचे लोणचे, पन्हे, मेथांबा, मुरांबा असे सगळे प्रकार करतो. या कैऱ्या चिरल्यानतंर त्याच्या कोयी आपण फेकून देतो. पण या कोयीलाही छान आंबटपणा असतो. अशावेळी ही कोय टाकून न देता आमटी करताना ती त्यात टाकल्यास आंबटसर मस्त चव येते. अशावेळी आमटीत चवीला थोडासा गूळ घालावा. तसेच फोडणीला मिरची, कडिपत्ता घातल्यास ही आमटी चविष्ट होते. वरुन भरपूर कोथिंबीर घातली की ही आमटी आणखीनच चविष्ट लागते.
२. वाटणाची आमटी
आपण आमटीला झटपट फोडणी देतो. कधी कांदा, टोमॅटो घालतो तर कधी लसूण आणि मिरची. तर कधी चिंच गूळाची आमटी करतो. पण ताजे मसाल्याचे वाटण करुन आमटी केली तर त्याची चव आणखीनच छान लागते. यासाठी वाटण कसे करायचे ते पाहूया. बारीक चिरलेला कांदा, लसणाच्या पाकळ्या, कोरड्या खोबऱ्याचा कीस, काळी मिरी, जिरे, ओवा, दालचिनी, धने, लाल सुकी मिरची आणि कडिपत्ता हे सगळे तेलात चांगले परतून घ्यायचे. गार झाल्यावर त्याची मिक्सरवर बारीक पेस्ट करायची. फोडणीत ही पेस्ट घालून चांगली परतून घेतल्यावर त्यामध्ये शिजलेली डाळ घालायची. आवडीनुसार गूळ आणि मीठ घालून आमटीला चांगली उकळी येऊ द्यायची. ही गरमागरम आमटी पोळी, भाकरी, भात कशासोबतही अतिशय छान लागते.
३. लिंबाची आंबट गोड आमटी
लहान मुले किंवा वयस्कर व्यक्ती घरात असतील तर फार तिखट पदार्थ करुन चालत नाही. तसेच घरात कोणी आजारी असेल तर तोंडाला चव येण्यासाठी आपण काही ना काही वेगळे करत असतो. अशावेळी ही झटपट होणारी सोपी आमटी आपण नक्की ट्राय करु शकतो. तेलात जीरे, हिंग, हळद, लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरचीचे एक किंवा दोन तुकडे घालायचे. फोडणी तडतड झाली की त्यामध्ये शिजलेले वरण घालायचे. यामध्ये लहान आकाराच्या अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा. लिंबू आंबट असल्याने चवीला साखर घालून मीठ घालायचे. उकळी आली की बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची. लिंबामुळे व्हिटॅमिन सी मिळते, तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.