आपण बाजारातून फळं, भाज्या आणतो खऱ्या पण ते साफ करुन जागच्या जागी ठेवणे हे एक काम असते. फळं घरातल्या सगळ्यांना खायला आवडतात पण ती सोलायची म्हटली की कोणालाच नको असते. आयते फोडी केलेले किंवा सोललेले फळ खायला सगळ्यांना आवडते. डाळींब आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. यातून आपल्याला लोह आणि इतरही अनेक व्हिटॅमिन्स मिळतात. मात्र डाळींब सोलणे ( Easy Way To Peel Pomegranate) हे एक मोठे जिकरीचे काम असल्याने आपण बाजारातून डाळींब आणली तरी कित्येक दिवस ती तशीच पडून राहतात. मात्र आपल्याला कोणी आयते दाणे खायला दिले तर मात्र आपण लगेच खातो. याचे कारण म्हणजे हे काम काहीसे वेळखाऊ असल्याने ते करायला आपल्याला नको वाटते.
डाळींब सोलायला वेळ तर लागतोच पण हे काहीसे किचकट काम असल्याने आपण डाळींब सोलायचा कंटाळा करतो. मग ही डाळींबे कडक होऊन जातात आणि मग ती चिरणेही काहीसे अवघड होऊन जाते. हीच समस्या लक्षात घेऊन प्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डाळींब सोलण्याची सोपी पद्धत सांगतात. यामुळे हात खराब तर होत नाहीतच पण इतरही फारसा पसारा होत नाही. अगदी सोप्या पद्धतीने आपण डाळींबाचे दाणे काढू शकतो. पाहूया डाळींबाचे दाणे काढण्याची सोपी पद्धत काय आहे.
१. डाळींबाच्या पुढचे आणि मागच सुरीने चिरुन घ्यायचे.
२. त्यानंतर सुरीने डाळींबाच्या ५ ते ६ फोडी करायच्या.
३. या फोडी एका बाऊलमध्ये उलट्या करुन त्यावर सुरीच्या मागच्या भागाने मारायचे.
४. यामुळे दाणे पटापटा खाली पडतात आणि डाळींब झटपट सोलले जाते.
५. यामध्ये फारसा पसारा होण्याचाही प्रश्न नसतो, त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने हे डाळींब सोलले जाते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटीझन्सनी मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर केला असून तुम्हीही ही ट्रिक वापरुन डाळींब सोलून पाहा. मास्टरशेफ पंकज भदौरिया आपल्या फॉलोअर्सना नेहमी स्वयंपाकाशी निगडीत काही ना काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स सांगत असतात. त्यांच्या या ट्रिक्स वापरुन स्वयंपाक सोपा होत असल्याने त्यांचे बरेच फॉलोअर्स आहेत.