उरलेल्या भाताचं काय करायचं हे मोठंच टेन्शन असतं. सारखा फोडणीचा भात खाऊनही कंटाळा येतो. उरलेला भात नुसता गरम करुन खावासा वाटत नाही. अशा वेळेस काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर उरलेल्या भाताची भजी करणं हा चांगला पर्याय आहे. संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून ही चटपटीत आणि कुरकुरीत भजी छान लागतात.
भाताची भजी कशी करावी?
भाताची भजी करण्यासाठी 1 कप उरलेला भात, 2 कप बेसन, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं आलं, लाल तिखट, हळद, 2 हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, धने पावडर, ओवा, जिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल घ्यावं.
Image: Google
भाताची भजी करण्यासाठी उरलेला भात आधी चांगला हातानं कुस्करुन घ्यावा. त्यात बेसन पीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तिखट, आलं घालून चांगलं एकत्र करावं. या मिश्रणात जिरे पावडर, धने पावडर, हिंग, ओवा आणि मीठ घालून सर्व साहित्य नीट मिसळून घ्यावं. हे मिश्रण दहा मिनिटं झाकून ठेवावं. नंतर त्यात पाणी घालून भज्यांच्या पिठासरखं सरसरीत मिश्रण करावं. तेल तापल्यावर चमच्यानं मिश्रण तेलात सोडून भजी मध्यम आचेवर तळून घ्यावीत. तळलेल्या भजीतलं जास्तीचं तेल निघून जाण्यासाठी भजी तळली की किचन टाॅवेलवर काढून ठेवावी. ही कुरकुरीत भजी पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत किंवा टमाट्याच्या साॅससोबत छान लागतात.