शुभा प्रभू साटम
पाऊस सुरु झाला की काहीतरी मस्त चमचमीत खावंसं वाटतं. त्यात बाहेर रिपरिप सुरु असेल तर पावसात जाऊन भाजी आणणंही नको होतो. आणि घरात नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो,काहीतरी चटपटीत हवंच. पण तेलकट नको, करायचा आटापिटा नको, झटपट करता आलं तर मस्त. हे सारं सहज जमून यावं म्हणून ही खास ही टोमॅटो चटणी. ही करण्याची कृतीही वेगळी आहे आणि चवही अफलातून!
गंमत म्हणजे ही चटणी करताना यामध्ये प्रत्यक्ष शिजवणे काहीही नाहीये. ही खरं तर नेपाळमधील पारंपरिक चटणी आहे. दुर्गम भागात राहणारे आणि अनेकदा गरीब घरातील कुटुंबे हा पदार्थ करतात. अशीच चटणी लडाख मध्ये पण दिली जाते. मोमो सोबत जी चटणी असते ना ती खरं तर ही! पहाडी पाककृती सुटसुटीत असतात, फार खटाटोप न करता झटपट होणारे पदार्थ करण्याकडे कल असतो. तेल मसाले यांचा वापर पण माफक असतो. मोजके जिन्नस लागतात याला, पण आपण त्यात भर घालून चव आणखीन वाढवू शकतो.
साहित्य
टोमॅटो चटणी
मोठे टोमॅटो 4 ते 5
लसूण थोडा जास्तच
आवडीप्रमाणे हिरवी अथवा लाल मिरची
साखर
मीठ
लिंबू रस
आवडीप्रमाणे कोथिंबीर
कृती
टोमॅटो लसूण मिरच्या चक्क वांग्याप्रमाणे खरपूस भाजून घ्या, जाळीवर भाजा अथवा तव्यावर. कसेही
तुम्हाला हवेतर वाटा अथवा आपण वांगे कसे कुस्करतो तसे कुस्करून घ्या. त्यात मीठ साखर लिंबू रस आणि कोथिंबीर,
आता यात व्हॅल्यू ऍडिशन काय कशी होईल?
1. भाजलेले टोमॅटो लसूण याना फोडणीवर परतुन
2. वरून कढीलिंब राई यांची फोडणी देऊन
3. फोडणीत कांदा परतून त्यात मग टोमॅटो घालून
4. नुसती शिजवून त्यात व्हिनेगर घालून
5. खजूर घालून
बेस तोच ठेवून असे काही डोक्यालिटी लावून करता येते,
अत्यन्त चविष्ट अशी ही चटणी ब्रेड परोठे किंवा डाळ भात यासोबत जमून जाते. बाहेर मस्त पाऊस पडत असताना चार घास जास्त आणि चविष्ट खाण्याची ही सोय.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)