लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीची खऱ्या अर्थाने सुरुवात. सकाळी अभ्यंगस्नान, नवीन कपडे घालून देवाला जाणे आणि फराळ होऊन सुस्तावलेली मंडळी. पण घरातील महिलांना मात्र आराम नसतो. नटून थटून बाहेर जाऊन आले तरी त्यांना घरी पाहुणे येणार असल्याने ओट्यापुढे उभे राहावेच लागते. आता जेवायला नेमके काय करायचे इथपासून तुमची सुरुवात असेल तर आम्ही काही पर्याय सुचवत आहोत. पाहुण्यांसाठी काहीतरी खास बेत करायचा खरा पण काय हेच अनेकदा सुचत नाही. त्यात बदलते वातावरण, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा विचार करावा लागत असल्याने मेनू ठरवताना गोंधळ होतो. उद्याचा बेत सोपा आणि सुटसुटीत व्हावा तरीही तो सगळ्यांच्या लक्षात राहील असा खास असावा असे तुम्हाला वाटत असेल तर आम्ही काही पर्याय सुचवत आहोत. यातच आदला दिवस भाकड दिवस आल्याने उद्याच्या स्वयंपाकातली काही तयारी तुम्ही आजच करु शकता. आदल्या दिवशी थोडी तयारी झालेली असेल तर ऐनवेळी फारसाा ताण पडणार नाही आणि तुम्हीही पाहुण्यांमध्ये गप्पा मारायला, एकत्र जेवायला बसू शकाल. चला तर मग पाहूयात हा हटके बेत...
मूग डाळीचा शिरा - लक्ष्मीपूजन म्हटल्यावर गोड तर हवेच. हे गोड विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अगदी सोपा असा मूगाच्या डाळीचा शिरा करु शकता. मूगाची डाळ पचायला हलकी आणि पौष्टीक असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने हा शिरा खाऊ शकतात. यासाठी मूग भाजून त्याची आदल्या दिवशीच भरड करुन ठेवा. यात सुकामेवा घालणार असाल तर त्याचेही आदल्या दिवशीच काप करुन ठेवा म्हणजे दुसऱ्या दिवशी शिरा करायला फार वेळ लागणार नाही. हा शिरा फ्रीजमध्ये दगोदन ते तीन दिवस सहज टिकत असल्याने उरला तरीही तुम्ही खाऊ शकता. मूगाचा रवा भाजण्यासाठी तूप थोडे जास्त लागत असल्याने हे घरात आहे की नाही याची खातरजमा करा.
सूप - थंडीचे दिवस असल्याने तुम्ही टोमॅटो किंवा पालक सूप नक्की करु शकता. यामध्ये थोडे ताजे क्रीम वरुन घातल्यास तसेच ब्रेड क्रम्स केल्यास याला हॉटेलचा फील नक्की येऊ शकेल. गरम-गरम सूप घशालाही बरे वाटत असल्याने तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा मुख्य जेवणासोबत हे सूप सर्व्ह करु शकता.
पुलाव- करायला अतिशय सोपा आणि तरीही सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे व्हेज पुलाव. ढोबळी मिरची, गाजर, मटार, फरसबी. फ्लॉवर यांसारख्या भाज्या आवडत असतील तर कॉर्न आणि पनीर हे पदार्थ घालून तुम्ही मस्त गरमागरम पुलाव करु शकता. यासाठी लागणाऱ्या भाज्या आदल्या दिवशी चिरुन ठेवल्या तरी चालू शकेल.
बटाटे वडे आणि चटणी - हा सगळ्यांना आवडणारा पदार्थ थंडीच्या दिवसात खायलाही छान वाटतो. गोड खाऊन कंटाळा आला असेल तर गरमागरम बटाटे वडे आणि चटणी हा बेत सगळ्यांना नक्की आवडेल. मात्र याची सगळी तयारी आयत्या वेळी करावी लागणार असल्याने आणि गरम सर्व्ह करावे लागणार असल्याने यासाठी तुम्हाला ऐनवेळीच काम करावे लागेल. चटणीसाठी लागणारे ओले खोबरे कोथिंबीर निवडणे ही तयारी तुम्ही आदल्या दिवशी नक्की करु शकता.
पण हा फक्कड बेत जमून आला तर आलेले पाहुणे आणि घरातील मंडळी तुमच्यावर नक्की खूश होतील आणि तुमच्या घरची दिवाळी पुढचे कित्येक दिवस लक्षात ठेवतील हे नक्की. तेव्हा दिवाळी करा आणखी खास तुमच्या जवळच्या मंडळींसोबत...