दिवाळी म्हणजे घरात पाहुण्यांची, नातलगांची लगबग. अशावेळी आपल्याकडून आलेल्या पाहुण्यांचा योग्य पाहूणचार व्हावा म्हणून घरातली स्त्री कंबर कसून कामाला लागते. सगळे पदार्थ छान, चवदार व्हावेत, आलेल्या मंडळींना जेवणाचा बेत आवडावा आणि सगळ्यांनी पोटभर जेवण करून तृप्त व्हावं, असं स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकीला वाटत असतं. पण खूप पाहुणे येणार म्हणजे खूप स्वयंपाक करावा लागतो. एरवी आपल्याला एवढ्या स्वयंपाकाची सवय नसते. म्हणूनच मग तिखट- मीठाचं माप जरा हुकण्याची शक्यता जास्त असते.
नेमकी व्हायची तिच गडबड होते आणि भाजी मस्त झणकेबाज, तेज तर्रार करण्याच्या नादात आपण त्यात जरा जास्तच तिखट टाकून देतो. एकवेळ तिखट कमी पडलं तर चालतं. पण जास्त झालं तर पदार्थ वाया जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच तर कधी गडबडीत चुकून जास्त तिखट पडलं तर हे काही सोपे उपाय करून बघा आणि बिघडलेला अधिक तिखट झालेला पदार्थ चवदार बनवा.
१. पदार्थात टाका लिंबूतिखट पदार्थाला आंबट पदार्थाची मात्रा बरोबर लागू पडते. जर एखादा पदार्थ खूप तिखट झाला तर एकतर त्यामध्ये लिंबू पिळून टाका किंवा मग टोमॅटोची प्युरी करून टाका. पदार्थाचा तिखटपणा कमी करण्यासाठी त्याला थोडं आंबट करा. लिंबू, चिंच, टोमॅटोची प्युरी हे काही आंबट पदार्थ तुम्ही तिखट कमी करण्यासाठी वापरू शकता. पण यापैकी कोणता पदार्थ वापरायचा हे तुम्ही कोणती भाजी, वरण किंवा कोणता पदार्थ केला आहे यावर अवलंबून आहे.
२. पदार्थात टाका पाणीतिखटपणा कमी करण्यासाठी त्या पदार्थाची क्वांटीटी वाढविणे हा एक चांगला उपाय आहे. पदार्थाचे माप वाढवायचे असेल तर त्यात थोडे उकळलेले पाणी टाका. पाणी टाकल्यानंतर आपण किती पदार्थ वाढवतो आहोत, यानुसार त्यामध्ये मीठ आणि इतर कोणते पदार्थ वापरले असतील ते टाका. तिखट जास्त पडल्यामुळे पदार्थ वाया जाण्यापेक्षा तो पदार्थ उरला, जास्त झाला तर एकवेळ चालतो. कारण तो एकतर नंतरही खाता येतो किंवा कुणाला देऊन तरी टाकता येतो.
३. गोड पदार्थ घालापदार्थाचा तिखटपणा कमी करण्यासाठी जसा आंबट पदार्थाचा वापर केला जातो, तसाच गोड पदार्थही उपयुक्त ठरतो. गुळ किंवा साखर यांचा वापर आपण यासाठी करू शकतो. तुम्ही कोणता पदार्थ करत आहात यावरून त्या पदार्थात साखर घालायची की गुळ टाकायचा, हे ठरवावे.
४. तेल किंवा बटर टाकाखूप तेल किंवा बटर खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. पण एखाद्यावेळी पदार्थ जास्त तिखट झाला, तर हा पर्याय वापरायला हरकत नाही. जर पदार्थ तिखट झाला असेल तर त्यात थोडे गरम तेल टाका किंवा मग बटर गरम करून टाका. या दोन्ही गोष्टी तिखटाचा मारा कमी करण्यास मदत करतात.
५. नारळाचे दूधपदार्थाचा तिखटपणा कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. अशावेळी चटकन एखादे नारळ किसा मिक्सरमध्ये फिरवून त्याचे दूध काढून घ्या आणि पदार्थाचे प्रमाण पाहून त्यात नारळाचे दूध टाका. नारळाचे दूध टाकल्याने पदार्थाची चव अजिबातच बदलत नाही. त्यामुळे हा एक पर्याय तुम्ही कायम वापरू शकता.