मऊसूत वाफाळते पोहे, त्यावर भूरभूरलेला नारळाचा किंवा खोबऱ्याचा किस, वरून पिळलेले लिंबू आणि सोबतीला लोणच्याची फोड हा मस्त आवडता नाष्टा. घरच्या मंडळींकडून किंवा घरी आलेल्या पाहुण्यांकडून गरमागरम पोह्यांची फर्माईश बऱ्याचदा केली जाते. कांदेपोहे तर केवढे प्रिय, लग्न ठरवण्याच्या प्रोसेसचा अजुनही एक महत्वाचा घटक. पण सोपे सोपे म्हणताना पोह्यांच्या रेसिपीचा पार फज्जा उडतो. म्हणूनच तर स्वादिष्ट पोहे बनविण्याचे काही टॉप सिक्रेट आहार तज्ज्ञांनी सांंगितले आहेत.
पोहे. तसे पाहिले तर हा अगदीच साधा सोपा पदार्थ. पण पोहे बनविण्याची योग्य पद्धत आणि प्रत्येक घटकाचे प्रमाण माहित नसल्याने गल्लत होते. प्रत्येकीने कधी ना कधी पोहे बनविले आहेत. कांदेपोह्याचा कार्यक्रम तर पिढ्यानपिढ्या मराठी महिलांची पाठराखण करीत आला आहे. असे असले तरी पोह्यांनी दगा दिल्याने पाहुण्यांसमोर उडालेली तारांबळ अनेक जणींनी अनूभवलेली आहे. पोह्यांना चांगला रंगच येत नाही, पोहे केले तरी ते जरा कच्चेच लागतात, वातडच होतात अशी अनेकींची तक्रार असते. कुणाच्या पाेह्यांना मऊपणाच येत नाही, तर कुणाचे पोहे अगदीच भिजट होतात. कुणाला कांदा आणि टोमॅटो किती टाकावा हे समजत नाही तर कुणाचा पोह्यातला बटाटा कच्चाच राहून जातो.
हे असं का होतं?
काय केलं तर पोहे उत्तमच होतील?
खाद्य संस्कृतीअभ्यासक शुभा प्रभू साटम सांगतात, उत्तम पोहे बनवण्याच्या सोप्या पण यशस्वी टीप्स..
पोहे करताना या गोष्टी विसरु नकाच..
१ जाड किंवा पातळ, कोणतेही पोहे प्रथम चाळून घ्या. कांद्या पोह्यांना शक्यतो जाड पोहे घेणं उत्तम. पोहे चाळून घ्या जेणेकरून त्यातील नाक म्हणजे लहान-लहान तुकडे आणि भुसा निघून जाईल.
२ पोहे भिजवावे असे सांगितले तर जाते. पण बऱ्याचदा किती वेळ भिजवावे, कसे भिजवावे याचा अंदाज चुकल्याने त्याचा गिचका होतो. ते टाळण्यासाठी पोहे पाण्याखाली धरून धुवावेत आणि चाळणीत ठेवावे.
३ पातळ पोहे करायचे असल्यास किंवा दडपे पोहे करताना पाेह्यांना पाण्याचा हात लावला तरी ते मऊ होतात. त्यांना भिजवायची गरज नाही. कांदा घालणार असल्यास चिरलेल्या कांद्यात पोहे कालवून ठेवले तरी जमते.
४ पोह्यात मीठ घालताना शेवटी घालावे. म्हणजे सर्वत्र समान लागते.
५. दगडी पोहे म्हणजे आपल्या जाड पोह्यांपेक्षा थोडे जाड पोहे. या पोह्याचा तळून केलेला चिवडा छान होतो.
६. कांदे पोहे करताना फोडणीत कांदा टाकून तो लाल होताना थोडे लिंबू पिळावे. म्हणजे कांदा चकचकीत दिसतो.
७. तिखट पोहे करताना कांदा पोह्याच्या प्रमाणाच्या अर्धा घ्यावा. कांदा खूप बारीक चिरू नये.
८. पोह्यांमध्ये मटार /गाजर /वांगी असे काहीही घालणार असल्यास प्रथम ते व्यवस्थित उकडून अथवा शिजवून घ्यावे. मगच फोडणी करावी.
९. दडपे पोहे करताना पोह्यांना नारळ पाणी किंवा नारळ दूध यांचा शिपकारा दिला तर चव वाढते.
१०. दही पोहे करताना जे दही वापरणार आहात, ते १० मिनिटे टांगून ठेवावे. अशा दह्यात कालविलेले पाेहे मुलायम पोताचे होतात.