Join us  

भरलं वांगं नेहमीच खातो, खाऊन पाहा गावरान पद्धतीचं ‘खारं वांगं’; पारंपरिक चमचमीत रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2023 12:01 PM

Traditional Khara Vanga Bringle Recipe : तिखट नसल्याने लहान मुलंही अगदी आवडीने ही भाजी खाऊ शकतात.

वांगं ही अनेकांच्या आवडीची भाजी, कधी आपण वांग्याचे उभे काप करुन ते परतून वांग्याची भाजी करतो तर कधी फोडी करुन कांदा, बटाटा घालून रस्सा भाजी. पण वांग्याचे काप किंवा भरलेलं वांगं अनेकांना विशेष आवडतं. भाकरीसोबत तर हा वांगं आणि खरड्याचा बेत म्हणजे अस्सल गावरान मेन्यू. भरलं वांगं म्हणजे त्यात खोबरं, दाण्याचा कूट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला हे सगळं ओघानेच आलं. तेलावर परतलेलं हे वांगं अतिशय चविष्ट होतं. मग या बेतावर चांगला ताव मारला जातो. वांगं वातूळ असल्याने जास्त खाऊ नये असं सांगितलं असलं तरी महाराष्ट्रीयन जेवणातील ही पारंपरिक रेसिपी असल्याने आणि सगळ्यांना आवडत असल्याने आवर्जून केली जाते. आज आपण भरल्या वांग्याचीच थोडी वेगळी अशी हिरव्या ग्रेव्हीची खारं वांगं रेसिपी पाहणार आहोत. हे खारं वांगं चवीला अतिशय छान लागतं आणि जास्त तिखट नसल्याने लहान मुलंही अगदी आवडीने ते खाऊ शकतात. यासाठीचा मसाला कसा करायचा पाहूया (Traditional Khara Vanga Bringle Recipe)...

१. साधारण अर्धी वाटी शेंगदाणे कढईमध्ये खरपूस भाजून घ्यायचे. ते भाजून झाले की त्यामध्ये १ ते २ चमचे तीळ घालायचे आणि तेही चांगले परतून घ्यायचे. मग हे दोन्ही चांगलं गार होऊ द्यायचं.

२. मिक्सरच्या भांड्यात लसूण, कोथिंबीर, मिरची, जीरं आणि सुक्या खोबऱ्याचे काप घालून पाणी न घालता हे सगळं बारीक वाटून घ्यायचे.

३. हे सगळं एका डीशमध्ये काढून मग मिक्सरच्या भांड्यात दाणे आणि तिळाच्या मिश्रणाचा जाडसर कूट करु घ्यायचा. 

४. हा कूट आधीच्या वाटणात घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि सगळे हाताने चांगले एकजीव करायचे. 

५. वांगी स्वच्छ धुवून त्यांची देठं आणि काटे काढून घ्यायचे. त्यानंतर वरच्या बाजूने वांग्याला २ छेद देऊन त्यामध्ये हा मसाला भरपूर प्रमाणात भरायचा. 

६. कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी, जीरं आणि कडीपत्ता घालून फोडणी करुन घ्यायची. मग त्यावर ही भरलेली वांगी घालून तेलावर चांगली परतून घ्यायची. 

७. बाकी राहीलेला मसाला, हळद, हिंग घालून पुन्हा सगळे चांगले परतून घ्यायचे. 

८. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून कढईवर झाकण ठेवायचे आणि वांगी चांगली शिजवून घ्यायची.  

९. ही गरमागरम भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबतही अतिशय छान लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.