Lokmat Sakhi >Food > दिवाळीत गोड खाऊन कंटाळला असाल तर बोटोडे नावाचा हा शेंगोळ्याचा भाऊ असलेला पदार्थ खायलाच हवा!

दिवाळीत गोड खाऊन कंटाळला असाल तर बोटोडे नावाचा हा शेंगोळ्याचा भाऊ असलेला पदार्थ खायलाच हवा!

विस्मरणातला फराळ : दिवाळीत गोड गोड नको असेल तर हा घ्या अस्सल झणझणीत उतारा. बोटोडे आणि बोटवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2023 07:05 AM2023-11-15T07:05:00+5:302023-11-15T07:05:01+5:30

विस्मरणातला फराळ : दिवाळीत गोड गोड नको असेल तर हा घ्या अस्सल झणझणीत उतारा. बोटोडे आणि बोटवडे

traditional Maharashtrian recipe, Diwali special food, Botode-Botwade- special spicy dish | दिवाळीत गोड खाऊन कंटाळला असाल तर बोटोडे नावाचा हा शेंगोळ्याचा भाऊ असलेला पदार्थ खायलाच हवा!

दिवाळीत गोड खाऊन कंटाळला असाल तर बोटोडे नावाचा हा शेंगोळ्याचा भाऊ असलेला पदार्थ खायलाच हवा!

Highlightsदिवाळी फराळाच्या किंवा कामाच्या गडबडीत बोटवड्यांची आमटी करून पाहा.

- साधना तिप्पनाकजे (रेसिपी सौजन्य - संपदा डावखरे)

फराळाच्या दिवसात सिन्नर भागातल्या घरांमध्ये पूर्वी एक पदार्थ आवर्जून तयार केला जायचा. हा पदार्थ फराळातला नसला तरी फराळाच्या दिवसांमध्ये केला जायचाच. भाकरी, चपाती आणि भात या तिघांसोबतही खाता येणारी बोटोडे आमटी किंवा रस्सा. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत घरातच तीन-चार पिढ्या असायच्या. अगदी चार पिढ्या नसल्या तरी घरातल्या माणसांची संख्या १५ ते ५० अशी असायचीच. मग इतक्या माणसांकरता फराळाची तयारीही फार आधीच सुरू व्हायची. रोजच्या स्वयंपाकाची गडबड, येणारे जाणारे आणि त्यात सणाची तयारी. अशावेळी घरातल्या लहान मुलांनाही मदतीला घेतलं जायचं. म्हणजे यात दोन हेतू असायचे एकतर मुलांना थोडावेळ तरी एका जागी बसवणं आणि आई, काकू यांना जरा तरी मदत.

घरातली आजी चणाडाळीच्या पीठात जीरं, थोडा ओवा, थोडंसं तिखट, हळद, मीठ आणि पाणी घालून घट्ट मळून ठेवायची. त्याला वरून तेलाचा हात लावायची. आजीचं पीठं मळून झालं की सगळ्या नातवंडांना हाका मारायची.  आता यातली काही जण चटकन येणार आणि काही मागेच रेंगाळणार. मग आजीचा आवाज चढला की लगेच उरलेली वरात जागेवर येऊन बसणार. मळलेल्या पीठातलं मोठ्या सुपारी एवढं पीठ हातात घेऊन त्याला वातीसारखं लांब वळायचं. वातीची टोकं जोडून मग त्यांना वरुन चपटं करायचं. 

मुलांना बोटोडे करायला बसवलं की, आजी किंवा मोठी ताई किंवा काकू रश्श्याची तयारी करायच्या. कांदा-सुकं खोबरं छान भाजलं की, त्यात लसूण-आलं घालायचं. यात घरातला काळा मसाला, कोथिंबीर घालून छान बारीक वाटायचं. टोपातलं तेल तापल्यावर हे वाटण चांगलं परतायचं. तेल सुटू लागल्यावर वाटणात पाणी आणि मीठ घालायचं. पाण्याला उकळी आली की बोटोडे सोडायचे. मंद आचेवर बोटोडे शिजू द्यायचे. बोटोडे शिजले की रश्श्यात वर तरंगू लागतात. हा रस्सा जरा दाटसरच ठेवायचा. मुख्य म्हणजे बोटोड्यात तिखट फार घालायचं नाही. रश्श्यातल्या काळा मसाल्याची चव याला यायला हवी. बोटोड्याचा रस्सा केला की दुसरी वेगळी भाजी वगैरे करायची गरज नसायची. अशाप्रकारे फराळ्याच्या गडबडीतही एक स्पेशल जेवण मात्र नक्की व्हायचं. तसं पाहायला गेलं तर शेंगोळे, चकोल्या आणि वरणफळांच्या फॅमिलीतलाच हा पदार्थ.


कितीही धावपळ दगदग झाली आणि यंदा मी फार काही करणार नाही असं म्हटलं तरी आपण दिवाळी फराळातला एखादा पदार्थ तरी करतोच. तर या वर्षी तुम्ही दिवाळी फराळाच्या किंवा कामाच्या गडबडीत बोटवड्यांची आमटी करून पाहा.

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत.)


 

Web Title: traditional Maharashtrian recipe, Diwali special food, Botode-Botwade- special spicy dish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.