साध्या जेवणालाही चविष्ट करण्याच्या सोप्या युक्त्या भारतीय पाककलेत आहे. जेवणातली साधी भाजी, कोशिंबीर आणि आमटी विशेष करण्याची सोय म्हणजे वरुन फोडणी देणे. फोडणी देण्याच्या विविध पध्दतीमुळेही (types of tadaka) पदार्थांना वेगवेगळा स्वाद आणता येतो. फोडण्यांच्या विविध प्रकारांमुळे रोजच्याच भाज्या, आमटी, कोशिंबीरीही वेगळ्या चवीच्या होतील. पदार्थांना वरुन फोडणी देण्यामुळे पदार्थांच्या चवीतच फरक पडतो असं नाही तर पदार्थांच्या गुणधर्मातही वाढ होते. फोडणीसाठी जी सामग्री वापरली जाते त्यात आयुर्वेदानुसार विविध गुणधर्म असतात. फोडणीच्या सामग्रीतील ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे पदार्थांची पौष्टिकता (healthy tadka) वाढते. नेहेमी एकाच प्रकारची फोडणी देवून कंटाळा आला असेल तर फोडण्यांचे विविध प्रकार वापरुन पाहा, जेवणाला आलेला तोचतोचपणा नक्की निघून जाईल.
Image: Google
रायता तडका
दही घातलेल्या पदार्थांना तडका देण्यासाठी रायता तडका हा फोडणीचा प्रकार आहे. यात प्रामुख्याने तूप वापरलं जातं. पण तेल वापरलं तरीही चालतं. रायता फोडणी करतानना तुपाला / तेलाला हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता यांची फोडणी दिली जाते. रायता फोडणी करताना मातीच्या भांड्यात कोळसा ठेवून फोडणीला स्मोकी फ्लेवरही देवू शकतो.
Image: Google
पंचफोरन तडका
पंचफोरन तडका ही फोडणी आसाम, बंगाल, महाराष्ट्र आणि पूर्व भारतात भाज्यांना दिली जाते. पंचफोरन फोडणीत मेथ्या, मोहरी, बडिशेप, जिरे आणि कलौंजी या पाच मसाल्यांचा वापर केला जातो. हे मसाले न वाटता अख्ख्या स्वरुपात स्वयंपाकात वापारल्यानं पदार्थाला विशिष्ट चव येते. पंचफोरन फोडणीसाठी मोहरीचं तेल वापरलं जातं.
Image: Google
नवरत्न तडका
दलिया, राजमा, बटाट्याची भाजी किंवा घट्ट डाळ यांना फोडणी देण्यासाठी नवरत्न फोडणी दिली जाते. नवरत्न फोडणीसाठी सुक्या लाल मिरच्या, चक्रफूल, उडदाची डाळ, अख्खे धने, कढीपत्ता, गरम मसाला, ओलं नारळ यांचा वापर केला जातो.
Image: Google
चटपटा आचारी तडका
कढी, खिचडी, रायतं या पदार्थांना चटपटीत चव आणण्यासाठी चटपटा आचारी फोडणी दिली जाते. या फोडणीच्या प्रकारात कलौंजी, मेथ्या, बडिशेप, ओवा, मोहरी, हिंग, लाल सुक्या मिरच्या, कसुरी मेथी यांचा वापर केला जातो.
Image: Google
कसुरी मसाला तडका
तवा पनीर, भरुन केलेल्या भाज्या, सुक्या भाज्या यांना कसुरी मसाला फोडणी दिली जाते. या प्रकारच्या तडक्यात कसुरी मेथी, लवंग, मोठी वेलची यांचा वापर प्रामुख्यानं केला जातो.