Join us  

३ पदरी मऊ-लुसलुशीत घडीची चपाती करण्याची खास ट्रिक; २ दिवस नरम राहतील चपात्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 2:11 PM

Tricks to Make Chapatis with Lots of Layers : घडीची चपाती करायला सर्वांनाच जमतं असं नाही काहीजणांना ही चपाती बनवणं खूपच किचकट आणि वेळ खाऊ वाटतं

चपाती हा सर्वांच्याच घरी खाल्ला जाणारा एक पदार्थ आहे. चपाती खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही असे अनेक लोक आहेत. घरी केलेली चपाती फुगत नाही, चपाती मऊ होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. (Cooking Hacks) काही घरांमध्ये घडीची पोळी बनवली जाते (Tricks to Make Chapatis with Lots of Layers). साध्या चपातीच्या तुलनेत घडीची चपाती जास्त मऊ होते. घडीची चपाती करायला सर्वांनाच जमतं असं नाही काहीजणांना ही चपाती बनवणं खूपच किचकट आणि वेळखाऊ वाटतं. ही चपाती करण्याची  सोपी पद्धत कोणती ते समजून घेऊ. (How To Make Ghadichi Chapati)

घडीची  चपाती करण्याची सोपी रेसिपी  (Ghadichi Chapati Making Process) 

1) घडीची चपाती करण्यासाठी सगळ्यात आधी पीठ, तेल, मीठ एकत्र करून त्यात गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. मळलेलं पीठ जास्त घट्ट किंवा सैल नसावं. या कणकेवर १० ते १२ मिनिटं झाकण ठेवून कणीक मुरू द्या. पण तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही थेट चपाती लाटायलाही घेऊ शकता. 

2) कणकेचा मध्यम आकाराचा गोळा घ्या. थोडं सुकं पीठ पसरवून गोळा व्यवस्थित लाटून घ्या. नंतर त्यावर थोडं तेल लावा. तेलावर थोडं पीठ लावून त्याची अर्धी घडी घालून घ्या. 

3) जाड, लांबट छोटी चपाती लाटून हातानं मधोमध २ वेळा दाबून ३ भागांत विभागून घ्या. घडीवर पुन्हा थोडं तेल आणि पीठ लावून पुन्हा त्याची घडी घाला. २ वेळा घडी घातल्यानंतर पोळी हातानं चपटी करून घ्या, जेणेकरून व्यवस्थित लाटता येईल.

4) पोळ पाटावर ही घडी घातलेली पोळी थोडं सुकं पीठ घालून गोलाकार लाटून घ्या. लाटताना चपाती सर्व बाजूंनी समान ठेवा.  जेणेकरून दोन्हीकडचे पदर व्यवस्थित लाटले जातील याची. जर चपाती कोणत्याही एका बाजूनं जाड असेल तर ती फुगत नाही. 

5) तापलेल्या तव्यावर सावकाश पोळी घालून थोड्या वेळानं पोळी गोल सरकवून नंतर ती उलटून घ्या. पोळी व्यवस्थित फुगली की तव्याच्या कडेने दाबा. नंतर चपाती उलटून दुसऱ्या बाजूनं शेकून ताटात काढून घ्या, त्यावर तूप किंवा तेल लावा. जवळपास २ ते ३ मिनिटं चपात्या गार झाल्यानंतर डवाबंद डब्यात ठेवा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स