भाऊबीजेच्या दिवशी अनेक जणींच्या घरी खूप पाहूणे जेवायला येणार असतात. कुणाकडे सगळे भाऊ- बहिण येणार असतात, तर कुणाकडे सगळा सासरचा गोतावळा असतो. यापैकी कोणीही आले किंवा सगळे एकदम आले तरी काय बरं भाजी करावी, याचं टेन्शन अजिबात घेऊ नका. या सर्व मंडळींना अस्सल मराठवाडी चवीची शेवभाजी चाखायला द्या. भाजीची चव घेता आलेली सगळी भावंडं खुश होऊन जातील... शिवाय या शेवभाजीची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही भाजी बनविण्यासाठी स्वयंपाक घरात मुळीच राबराब राबावं लागत नाही. कमी श्रमात मस्त भाजी तयार होते. शिवाय ऐनवेळेला खूप पाहूणे आले किंवा स्वयंपाकाच्या प्रमाणाचा अंदाज हुकला तरी चिंता करण्याची गरज नाही. कारण भाजीचे प्रमाण वाढविणेही अतिशय सोपे आहे. शेवभाजी भातासोबत
शेवभाजी करण्यासाठी लागणारे साहित्यअद्रक लसून पेस्ट, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तेल, खोबरे, धने, जिरे, मेथ्या, खसखस, बडिशेप, दालिचनी आणि चवीनुसार तिखट, मीठ, गरम मसाला.
कशी करायची शेवभाजी?- शेवभाजी करण्यासाठी सगळ्यात आधी खोबरं कढईत टाकून भाजून घ्या. यानंतर खोबरं काढा आणि कढईत धने, जिरे, मेथ्या, खसखस, बडिशेप, दालचिनी हे सगळं साहित्य टाकून चांगलं भाजून घ्या. - हे सगळं साहित्य थंड होऊ द्या आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याची अतिशय बारिक पेस्ट करून घ्या.- यानंतर कढईत तेल तापत ठेवा. तेल तापलं की त्यात हळद टाका. त्यानंतर कांद्याची पेस्ट करून त्यात टाका आणि लालसर होईपर्यंत चांगली परतून घ्या.
- कांद्याची पेस्ट चांगली परतून घेतली की त्यात अद्रक- लसूण पेस्ट टाका आणि ती देखील चांगली परतून घ्या.- कांदा जेवढा घेतला असेल तेवढेच टोमॅटो घ्या आणि टोमॅटोची प्यूरी करा.- अद्रक- लसूण पेस्ट परतून घेतले की त्यात टोमॅटोची प्युरी टाका आणि चांगली परतून घ्या. टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत ती परतली गेली पाहिजे.- टोमॅटोची प्युरी जेव्हा एकजीव होईल आणि कढईपासून मोकळी होऊन त्याला तेल सुटते आहे, असं वाटलं की या मिश्रणात गरम पाणी टाका.- भाजी किती पातळ हवी आहे, यावरून पाणी किती टाकायचं ते ठरवा.
- पाणी टाकल्यानुसार आवडीनुसार तिखट, मीठ, गरम मसाला टाका आणि भाजीला चांगली उकळी येऊ द्या.- उकळल्यानंतर गॅस बंद करा. कढईवर झाकण ठेवा आणि भाजी सेट होऊ द्या.- यानंतर गरमागरम भाजी सर्व्ह करा. भाजी सर्व्ह केल्यानंतर त्यात शेव टाका.