कोल्हापूर (Kolhapur) म्हटलं की डोळ्यासमोर येतात झणझणीत पदार्थ. शिवाय कोल्हापूर थाली मिरचीच्या खर्ड्याशिवाय (Mirchi Kharda) अपूर्ण आहे. जिभेची चोचले पुरवण्यासाठी अनेक जण ताटात खर्डा घेतातच. जर घरात भाजी नसेल तर, बरेच लोकं चपाती किंवा भाकरीसोबत खर्डा खातात.
काही जण मिरचीचा ठेचा म्हणतात तर, काही लोकं मिरचीचा खर्डा म्हणतात. मिरचीचा खर्डा करण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण जर आपल्याला कोल्हापुरी पद्धतीचा झणझणीत चटकदार खर्डा खायचा असेल तर, ही रेसिपी नक्की करून पाहा (Cooking Tips). काही मिनिटात ही रेसिपी तयार तर होतेच, शिवाय करायलाही सोपी आहे. जर आपण तिखट खाण्याचे शौकीन असाल तर, ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पाहा(Try out this amazing Recipe Kolhapuri Kharda).
कोल्हापुरी स्टाईल खर्डा करण्यासाठी लागणारं साहित्य
हिरवी मिरची
लसणाच्या पाकळ्या
शेंगदाणे
जिरं
मीठ
कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम, तव्यावर २ चमचे तेल घाला. नंतर त्यात ६ ते ७ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर शेंगदाणे घालून साहित्य भाजून घ्या. नंतर त्यात एक चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून साहित्य एकत्र मध्यम आचेवर भाजून घ्या.
साहित्य भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करा. साहित्य थंड झाल्यानंतर वरवंट्याने ठेचून घ्या. तयार खर्डा एका बाऊलमध्ये काढून घ्या. स्टोर करून ठेवल्यास खर्डा १० दिवस आरामात टिकतात. अशा प्रकारे कोल्हापुरी पद्धतीचा गावरान खर्डा खाण्यासाठी रेडी. आपण हा खर्डा चपाती, भाकरी किंवा भातासह देखील खाऊ शकता.