Join us  

खाऊन पाहा कैरीचं आइस्क्रीम, मँगो आइस्क्रीम विसराल अशी आंबट-गोड चव, घ्या रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 5:32 PM

कैरीचं आइस्क्रीम कधी खाल्लं आहे का? करुन पाहा स्पेशल चवीचं आंबट गोड आइस्क्रीम

ठळक मुद्देकैरीचं आइस्क्रीम करण्यासाठी कैरी किसून, साखर घालून वाटून मग उकळत्या दुधात मिसळावी.

उन्हाळ्याच्या दिवसात सकाळ संध्याकाळ नुसतं आइस्क्रीम खायला दिलं तर ना कोणाची आहे? पण आइस्क्रीम म्हटलं की विकतचंच कशाला? घरी केलेलं आइस्क्रीमही छान लागतं. आइस्क्रीमध्ये काही चवींचे प्रयोग करायचे झाल्यास तेही करता येतात. बाजारात मस्त हिरव्यागार कैऱ्या आल्या आहेत. या कैऱ्यांचा साखरआंबा, मेथांबा, लोणचं,चटणी, टक्कू, पन्हं असे प्रकार करुन झाले असतील तर नवीन रेसिपी ट्राय करा. कैरीचं आइस्क्रीम करुन पाहा. ऐकायला विचित्र वाटलं तरी हे आइस्क्रीम चवीला एकदम भन्नाट लागतं. करायलाही एकदम सोपं. ही रेसिपी वाचल्यानंतर लगेच कामाला लागा!

Image: Google

कैरीचं आइस्क्रीम कसं कराल?

कैरीचं आइस्क्रीम करण्यासाठी 2 कप कैरीचा किस, अर्धा लिटर दूध, अर्धा कप साय/ क्रीम, अर्धा कप साखर, 1 चमचा बदामाची पूड, 1 चिमूटभर खायचा हिरवा रंग आणि 2 चमचे सुकामेवा घ्यावा. 

Image: Google

कैरीचं आइस्क्रीम करण्यासाठी कैरी धुवून पुसून घ्यावी. कैरी किसून घ्यावी. किसलेल्या कैरीत साखर घालून मिक्सरमधून ते बारीक करुन घ्यावं.  कढईत दूध गरम करावं. दूध गरम झालं की दुधाला उकळी काढावी. दूध उकळल्यानंतर दुधामध्ये कैरीची पेस्ट टाकावी. कैरी दुधात चांगली मिसळून घ्यावी. आणखी पाच मिनिटं दूध उकळू द्यावं. नंतर गॅस बंद करुन  दुधात साय, बदामाची पूड, हिरवा रंग आणि सुका मेवा घालून मिश्रण चांगलं हलवून घ्यावं.

मिश्रण थंड होवू द्यावं. ते थंड झाल्यावर आइस्क्रीमच्या भांड्यात घालून ते फ्रिजरमध्ये ठेवावं. दीड ते दोन तासांनी ते घट्ट झालं की मिक्सरमधून फिरवून घ्यावं आणि पुन्हा हे मिश्रण आइस्क्रीमच्या भांड्यात घालून ते फ्रिजरमध्ये ठेवून द्यावं. यानंतर दोन तासांनी कैरीचं स्पेशल चवीचं आइस्कीम तयार होतं. 

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल