Join us  

ना पोळी ना पराठा, ही 'मसाला पोळी' खाऊन तर पाहा, पोषण भरपूर- करायलाही सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2024 1:35 PM

Try this different roti options for a change : नेहमीचीच पोळीला द्या थोडा ट्विस्ट, नाश्ता-जेवण होईल जास्त चविष्ट-पोषक

पोळी-भाजी आपण सगळे रोजच खातो. कधी पोळीचा कंटाळा आला तर आपण पराठे, भाकरी किंवा पुऱ्या करतो. पण त्यापेक्षा वेगळं आणि तरीही पौष्टीक असं काही करायचं असेल तर. आज पोळीपासूनच थोडे वेगळे पण चविष्ट आणि भरपूर पोषण देणारे असे काही प्रकार सकाळच्या घाईत कसे करता येतील ते आपण पाहणार आहोत. लहान मुलांना नेहमीची पोळी खाऊन कंटाळा आला असेल किंवा वेगळा नाश्ता करायला वेळ नसेल तर पोळ्या करतानाच झटपट करता येतील असे हे प्रकार नाश्ता, डब्यासाठीही उत्तम पर्याय ठरु शकतात. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून या वेगळ्या प्रकारच्या पोळ्या होत असल्याने त्यासाठी फार विशेष कष्ट घ्यायचीही गरज लागत नाही. पाहूयात हे प्रकार कोणते आणि कसे करायचे (Try this different roti options for a change). 

१. दाण्याचा कूट- लसूण 

पोळी करताना त्याच्या घडीत भरण्यासाठी दाण्याचा कूट, किसलेला किंवा ठेचलेला लसूण आणि आवडीनुसार धणेजीरे पावडर, तिखट आणि मीठ घालावे. शेंगादाण्यामध्ये प्रोटीन असते तसेच लसूणही आरोग्यासाठी चांगला असल्याने ही स्टफ केलेली पोळी किंवा पराठा हेल्दी होतो. इतकेच नाही तर याची चवही छान लागत असल्याने लहान मुलंही गरमागरम पोळी दही, हिरवी चटणी किंवा अगदी सॉससोबत आवडीने खातात. 

(Image : Google)

२. तीळ-कोथिंबीर

थंडीच्या दिवसांत तीळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. शरीराला ऊर्जा आणि प्रोटीन देणारे तीळ आहारात आवर्जून समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, मीठ, तिखट आणि तीळ असे मिश्रण एकत्र करुन ते पोळी लाटताना त्यावर लावून लाटल्यास नेहमीच्याच पोळीचे पोषण वाढण्यास मदत होते. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या कुलचा या प्रकाराचा फिलही त्यामुळे येतो. 

(Image : Google)

३. पनीर किंवा चीज 

पनीर आणि चीज या गोष्टी तर दुग्धजन्य पदार्थांत येत असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असतातच. पोळी लाटताना त्यामध्ये पनीर किंवा चीज किसून घातल्यास पोळीचे नेहमीपेक्षा जास्त हेल्दी होते. यामध्ये तुम्ही आवडीनुसार मीरपूड, मिक्स हर्बस असे काहीही घालू शकता. लहान मुलं अशी पोळी अतिशय आवडीने खातात. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.