उन्हाळ्याच्या दिवसांत हवेतील तापमान वाढले की आपल्या घशाला कोरड पडते. त्यामुळे सतत पाणी प्यावेसे वाटते. उन्हामुळे अंगातील ताकद कमी झाल्यासारखे आणि थकवा आल्यासारखे वाटते आणि मग आपल्याला तरतरी येणारे काहीतरी घ्यावेसे वाटते. अशावेळी आपण सरबत, ताक, नारळ पाणी असं काही ना काही घेतो. याच काळात बाजारात कलिंगड, खरबूज, काकडी अशी फळंही मोठ्या प्रमाणात येतात. शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहावी आणि आरोग्य उत्तम राहावे यासाठी आपण या फळांचा आहारात आवर्जून
समावेश करतो. जेवणातही आपण काकडी किंवा काकडीची कोशिंबीर घेतो. पण याशिवायही काकडीची आणखी एक छान अशी रेसिपी आपण अगदी झटपट करु शकतो. उन्हाळ्यात ही रेसिपी शरीराला थंडावा तर देईलच, पण नेहमी तीच तीच सरबतं पिऊन कंटाळा आला असेल तर ही स्मूदी उत्तम पर्याय ठरेल. पाहूयात ही काकडीची स्मूदी कशी करायची (Cucumber Smoothie Sharbat Summer Special Recipe).
काकडीचे सरबत किंवा स्मूदी करायची सोपी रेसिपी...
साहित्य -
१. काकडी - १ ते २
२. पुदिना - ५ ते ६ पाने
३. आलं - १ इंच
४. लिंबाचा रस - १ चमचा
५. काळं मीठ - अर्धा चमचा
६. मध - अर्धा चमचा
७. तुळशीचं बी - २ चमचे
८. बर्फाचे खडे - ३ ते ४
९. पाणी - अर्धा ग्लास
कृती -
१. तुळशीच्या बिया सोडून सर्व घटक मिक्सरमध्ये एकत्र करावेत व त्याचा ज्यूस तयार करावा.
२. तुळशीच्या बिया काही तास आधीच पाण्यामध्ये भिजवून ठेवाव्यात.
३. मिक्सर केलेला ज्यूस ओतताना सर्वात खाली तुळशीच्या बिया घालाव्यात आणि त्यावर हे सरबत घालावे.
४. गारेगार सरबत भर उन्हात अतिशय उपयुक्त ठरते.
टिप
अन्नपचन क्रिया व्यवस्थित होण्यासाठी, वजन नियंत्रणात राहण्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राहण्यासाठी आणि त्वचेच्या समस्या दूर होण्यासाठी हे सरबत किंवा स्मूदी पिणे फायदेशीर ठरते.