प्रतिभा भोजने जामदार
गुलाबाचे मोदक आणि उकडीची सुंदर गुलाबी फुलं, खाण्याची. उकडीच्याच मोदकाचं हे सुंदर रुप आहे. कसे करायचे हे रोज मोदक, गुलाब मोदक.
साहित्य
२ वाट्या ओला नारळ, अर्धी वाटी किसलेला गूळ, अर्धी वाटी रोज सिरप, साजुप तूप, २ वाट्या तांदूळ पिठी.
कृती
उकड-२ वाट्या पाणी उकळून घ्यावे, त्यात १ चमचा साजूक तूप घालावे आणि आणि काही चमचे रोज सिरप घालावे. (रोज सिरप चे प्रमाण आपण आपल्याला किती डार्क गुलाबी रंग हवा त्यावर ठरवावे. सोबतच्या व्हीडिओमध्ये मी एकदम फिक्या गुलाबी रंगाचा मोदक बनवलेत.) उकळत्या पाण्यात २ वाट्या तांदूळ पीठ घालून ढवळून उकड काढावी. ही उकड बाजूला ठेवून द्यावी.
सारण-२-३ चमचे रोज सिरप एका कढईत घेऊन त्यात गूळ घालून तो विरघळवून घ्यावा. त्यात ओला नारळ घालून मिक्स करावे. मिश्रण थोडे कोरडे करावे आणि २ चमचे तूप घालून मिक्स करून ठेवून द्यावे. मी गुलाबाची चव आणि गंध रहावा म्हणून मुद्दाम वेलची वापरलेली नाही.
उकड गरजेनुसार पाणी वापरून मळून घ्यावी. त्याचे छोटे छोटे गोळे करून हाताने वाटी बनवावी. वाटीमध्ये पुरेसे सारण भरून बोटाने अलगद पारी बनवावी. हळुवार सगळ्या पाऱ्या एकत्र मिटून मोदकाचा आकार द्यावा. चाळणीला तूप लावून त्यावर सगळे मोदक ठेवून उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर किंवा मोदकपात्रात ती चाळण ठेवून १५ मिनिटे मोदक वाफवून घ्यावेत. उकडलेल्या मोदकांना साजूक तुपाचा ब्रश लावून खायला घ्यावेत.
(छायाचित्र- प्रतिभा जामदार)
या व्हीडिओमध्ये मी गुलाब-रोज मोदकांसह मी उकडीची गुलाबाची फुले (खाण्याची) देखील बनवलेली आहेत. ही फुलं दिसतात छान आणि चवीलाही सुरेख. ही फुले मात्र भरपूर तुपासोबत खावीत.
करुन पहा हे रोज मोदक.
(प्रतिभा जामदार यांच्या 'संध्याई किचन' या युट्यूब चॅनलवर विविध पाककृतीही पाहता येतील.)