महिलांच्या जिव्हाळ्याचे दोन विषय आहेत. एक म्हणजे सौंदर्य आणि दुसरे म्हणजे आरोग्य. या दोन्ही गोष्टी मिळविण्यासाठीचे बहुतांश पर्यायही आपल्या स्वयंपाकघरात किंवा अगदी आजूबाजूलाच लपून बसलेले असतात. फक्त प्रॉब्लेम असा होतो की, आपल्याला याबाबत माहितीच नसल्याने आपण ते शोधून पाहण्याचा प्रयत्नच करत नाही. अशाच पद्धतीचे दुर्लक्ष आपण करटोली या रानभाजीकडे करत आहोत. अनेक जणींना करटोली भाजी माहिती आहे आणि तिचे फायदेही माहिती आहेत. पण ही भाजी नेमकी करायची कशी याची रेसिपी माहिती नसल्याने आपण ती भाजी घेणे टाळतो. या भाजीमुळे आरोग्याला मिळणारे फायदे आता अनेक लोकांना समजले आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून इतर राज्यांमध्ये करटोलीची निर्यात देखील सुरू झाली आहे. या भाजीचे फळ अतिशय उपयुक्त असून त्याचीच भाजी करण्यात येते. momordica dioica हे या भाजीचे शास्त्रीय नाव आहे.
करटोलीची चमचमीत रेसिपी
- करटोलीचे दोन भाग करून घ्या आणि त्यातील बिया व जास्तीचा गर काढून टाका.
- नंतर इतर भाज्या जशा कापतो, तसेच करटोलीही कापून घ्या. खूपच लहान तुकडे करून नका आणि जास्त मोठेही ठेवू नका.
- कढईमध्ये मोहरी, हिंग, जीरे, आवडीनुसार हिरव्या मिरच्या टाकून फोडणी करा.
- यानंतर त्यात कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या.
- कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये चिरलेली करटोली टाका आणि झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या. कारटोली थाेडीशी मऊसर झाली की झाली ही भाजी खाण्यासाठी तयार.
- या भाजीत वरून पाणी घालण्याची गरज नाही.
- आवडीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर साखर घाला.
- काही जणांना या भाजीवर किसलेले खोबरेही आवडते.
करटोलीची भाजी का खायची ?१. डोकेदुखीवर रामबाण इलाज म्हणून करटोलीची भाजी ओळखली जाते.२. करटोलीची भाजी खाण्यामुळे भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. ३. करटोलीच्या कंदाचे चुर्ण मधुमेह तसेच मुळव्याध या आजारात उपयुक्त ठरते.४. करटोलीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे ॲण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.५. सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यात होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी करटोली गुणकारी ठरते.६. बद्धकोष्ठता, दमा असलेल्या रूग्णांना डॉक्टर करटोली खाण्याचा सल्ला देतात. ७. त्वचारोगासाठीही करटोली उत्तम असते.