कैरी दिसली की तोंडाला पाणी सुटतंच. कशातही कैरी चिरुन/ किसून टाकली तर पदार्थाला मस्त चव येते. जेवणात तोंडाला चव आणणारी पुदिना कैरीची चटणी करुन ठेवावी. पोळी, पराठा, धिरडं अगदी साध्या खिचडीसोबतही कैरी पुदिन्याची गोड आंबट चटणी छान लागते.
(Image: Google)
कैरी पुदिन्याची चटणी
कैरी पुदिन्याची चटणी करण्यासाठी अर्धा किलो कैरी, 1 कप पुदिन्याची पानं, अर्धा कप किंवा चवीप्रमाणे साखर, 1 छोटा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचचा सूंठ पूड, अर्धा चमचा सैंधव मीठ आणि चवीनुसार साधं मीठ घ्यावं.
कैरी पुदिन्याची चटणी करताना कैरी धुवून पुसून घ्यावी. कैरी किसून घ्यावी. पुदिना निवडून-धुवून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात किसलेली कैरी, पुदिन्याची पानं, साखर आणि थोडं पाणी घालावं. मिक्सर एकदा फिरवून घ्यावा. नंतर यात इतर सर्व मसाले घालून मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरधून फिरवून घेतलं की कैरी पुदिन्याची आंबट गोड चटणी तयार होते.
(Image: Google)
कैरी आणि ओल्या नारळाचीचटणी
ओल्या नारळाचा वापर करुनही कैरीची चटणी करता येते. या पध्दतीची चटणी करताना 3 मोठे चमचे कैरी, 1 कप किसलेलं ओलं खोबरं, 2 चमचे हरभरा डाळ ( भाजून घेतलेली), 8-10 कढीपत्त्याची पानं, चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा मोहरी, 2 सुक्या लाल मिरच्या, 3 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ घ्यावं.
कैरी नारळाची चटणी करताना मिक्सरच्या भांड्यात किसलेली कैरी, खोबरं, हरभरा डाळ, कढी पत्ता, कोथिंबीर, लाल मिरच्या आणि मीठ घालून ते वाटून घ्यावं. वाटताना सर्व मिश्रण मिळून येण्यासाठी थोडं पाणी घालावं. वाटली चटणी एका भांड्यात काढावी. कढईत तेल घालावं. ते तापवून त्यात मोहरी, उडदाची डाळ, कढी पत्ता आणि एक सुकी लाल मिरची फोडणी द्यावी. ही फोडणी तयार चटणीवर घालावी. खमंग चवीची कैरीची चटणी छान लागते.