- शुभा प्रभू साटम
गणपती आणि मोदक एकसुरात म्हटलं जातं. मोदक म्हणजे गणपती आणि गणपती येणार की मोदक मग उकडीचे असोत अथवा तळणीचे. मोदक पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात वेगवेगळ्या पद्धतीनं होतात. पण मराठी मनात असतो तो शुभ्र सुरेख कळ्या असणारा उकडीचा मोदक.
उकडीचे मोदक तसे करायला थोडे कठीण.कारण उकड व्यवस्थित जमली नाही, तर आवरण चामट होते,जर ते पातळ झाले तर मोदक उकडताना फुटतात.जाड आवरण असेल तर चव बरोबर लागत नाही.थोडक्यात उत्तम उकड= उत्कृष्ट मोदक. ती जमण्यासाठी काही खास युक्त्या..
छायाचित्र- गुगल
उत्तम उकड कशी जमेल?
1. उकडीसाठी थोड्या नव्या तांदुळाची पिठी असल्यास बरं.
2. एक वाटी पिठी तर पाऊण वाटी पाणी हे प्रमाण लक्षात ठेवावं.
3. पाणी उकळत ठेवून छोटी उकळी आली की मगच पिठी घालावी. उलथणे अगदी बुडापासून घेवून, उकड ढवळून घ्यावी. हे करताना आच मात्र मंदच हवी.
4. लुसलुशीत पारीसाठी उकड घेताना थोडे भिजवलेले साबुदाणे घातले की उकडीला मुलायम पोत येतो.
5.उकड गरम असतानाच, परातीत काढून,तूप आणि पाण्याचा हात लावून, छान मळून घ्यावी.त्यामुळे तांदुळातील चिकटपणा व्यवस्थित पसरतो.
6. उकड मळून घेताना एका दिशेनं मळावी.कणिक तिंबतो तसे करू नये. तळहाताच्या शेवटील भागानं उकड मळावी.
छायाचित्र- गुगल
7. उकडीचे मोदक छान जमण्यासाठी सारणही तितकंच नीट जमायला हवं. मोदक उकडताना ते फुटून बाहेअ आलं तर उकडीच्या मोदकांचं सौंदर्य जातं, मोदक बिघडतो. यासाठी ओल्या खोबऱ्याला गूळ फासून, अर्धा तास ठेवले की, गुळाच्या अंगच्या पाण्यानं मिश्रण ओलसर होऊन,चांगलं शिजतं.
8. मोदक पारी हातानं जमत नसेल, तर पुऱ्या करायचे हात मशिन असते त्यात लाटी ठेवून किंवा चक्क पोळपाटावर लाटून, एकसमान पुरी करून मग त्याचे मोदक करता येतात.
9. मोदक उकडायला ठेवताना ते पाण्यातून बुडवून घेतले की फुटत नाही.
उकडीचे मोदक हे अवघड वाटत असले तरी हे तंत्र आणि कला सरावाने सहज जमणारी गोष्ट आहे.यंदा गणपतीसाठी उकडीचे मोदक करताना हे करुन पहा!
(खाद्यसंस्कृती आणि पाककला यांचा प्रदीर्घ अभ्यास असणार्या लेखिका मुक्त पत्रकार असून स्त्री मुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.)
shubhaprabhusatam@gmail.com