उकडीचे मोदक म्हणजे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पक्वान्न. कोकण भागातील हे पक्वान्न आता महाराष्ट्रभर आणि भारतात तसेच परदेशातही अतिशय आवडीने खाल्ले जाते. तांदळाची उकड आणि खोबरं गुळाचं सारण इतकेच मुख्य जिन्नस असलेला हा पदार्थ इतका चविष्ट लागतो की हे मोदक कोणाला आवडत नाहीत असा व्यक्ती सापडणे कठिणच. गणपती बाप्पाच्या आवडीचे हे मोदक गणेशोत्सवात तर आवर्जून केले जातात. घरोघरी तांदळाची उकड घेणे आणि नारळ खोवणे ही कामे या काळात सुरू असतात. स्वयंपाक आणि कोणताही पदार्थ करणे ही एकप्रकारची कला आहे, त्यामुळे उकडीचे मोदक करणे हेही तितके सोपे काम नाही (Ukdiche Modak Ganpati Festival Special Sweet Recipe).
वाटायला हे मोदक सोपे वाटत असले तरी नारळ खोवता येणे, उकड चांगली घेता येणे, सारण चांगले होणे, उकडीची पारी न फुटता मोदक उकडले जाणे ही सगळी प्रक्रिया खऱ्या अर्थाने जिकरीची आहे. अनेकांना हे मोदक करणे जमतेच असे नाही. कधी सारण फसते तर कधी मोदकाची उकड चुकते. मात्र अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे मोदक आवडीने खात असल्याने ते परफेक्ट जमायलाच हवेत. पाहूयात उकडीच्या मोदकांचे सारण चुकू नये आणि हे पक्वान्न परफेक्ट जमावे म्हणून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी...
१. मोदकाचे सारण करण्यासाठी ओला नारळ एकसारखा खोवायला हवा. नारळ खोवणे ही पण एक कला आहे, त्यामुले त्यामध्ये करवंटीच्या वरच्या भागाच्या शिरा, आतला चॉकलेटी भाग अजिबात यायला नको, नारळ पांढरा शुभ्र असेल तर सारण अतिशय छान होते.
२. गूळ घेताना तो खूप चिकट किंवा खूप जास्त कडक असलेला असा घेऊ नये. त्यामुळे सारण फसण्याची शक्यता असते. नेहमीचा ठिसूळ लालसर रंगाचा गूळ घ्यावा. गूळ खूप पिवळा किंवा काळा असेल तरी सारणाचा रंग आणि चव बदलते. त्यामुळे गुळाची निवड करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.
३. सारण शिजवताना तूप घातल्यावर आधी वाटीने मोजून नारळाचा चव घालावा आणि त्यानंतर त्याच वाटीने मोजून नारळाच्या अर्धा गूळ घालावा. यामुळे गोडी आणि घट्टपणा चांगला होण्यास मदत होते. काही जण गूळ आणि साखर एकत्र करतात. पण त्यामुळे सारणाची चव आणि पोतही बदलतो. त्यापेक्षा पूर्ण गूळ घेतला तर जास्त चांगले लागते.
४. सारण शिजत असताना सतत हलवत राहावा आणि भांड्याच्या तळाला सारण चिकटू देऊ नये. कारण एकदा ते चिकटले की ते चिवट आणि कडक व्हायला लागते. शिजत आल्यावर त्यात खसखस, वेलची पूड घालावी. आवडीनुसार ड्रायफ्रूटसही घालू शकतो. मग हे सारण हलवून एकजीव करावे आणि गॅस बंद करावा.