आषाढी किंवा कार्तिकी एकादशी, महाशिवरात्री असे काही उपवास घरातली सगळी मंडळी मिळून करतात. त्यामुळे मग सगळ्यांनाच आवडेल आणि चटपटीतही होईल, असे काही पदार्थ करताना मात्र घरातल्या बायकांची तारांबळ उडते. प्रत्येकाच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ करण्यापेक्षा उपवासाच्या दिवशी बटाट्याचा किस ही एक उत्तम ब्रेकफास्ट डिश ठरू शकते.
बटाट्याचा किस अनेकदा बिघडतो, अशी काही जणींची तक्रार असते. कधी कच्चा राहतो तर कधी खूपच शिजून अगदी लगदा होऊन जातो. करताना काही तरी कमी जास्त होते आणि म्हणून मग ही रेसिपी बिघडून जाते. त्यामुळे बटाट्याचा किस करण्याची ही नवी रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी अतिशय सोपी असून खूपच कमी साहित्य लागते. तसेच करायलाही खूप कमी वेळ लागतो.
साहित्यबटाटे, तूप, जिरे, मिरची, तिखट, साखर, चवीनुसर मीठ
कृती- सगळ्यात आधी तर बटाट्याची साले काढून ते किसून घ्या.- यानंतर नॉनस्टिक पॅनमध्ये तूप टाका. तूप गरम झाल्यावर जिरे टाका. काही घरांमध्ये उपवासाला जिरे खात नाहीत. त्यामुळे त्यांनी नाही टाकले तरी चालते.- गरम झालेल्या तुपात मिरचीचे तुकडे टाकून परतून घ्या.- यानंतर बटाट्याचा किस या तुपात टाकावा आणि चांगला परतून घ्यावा.- किस परतला गेल्यावर त्यात थोडे तिखट आणि चवीनुसार मीठ टाकावे.- यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवावा. कढईवर झाकण ठेवावे आणि चांगली वाफ येऊ द्यावी.- साधारणपणे १० मिनिटांनी वाफ आल्यावर त्यामध्ये चिमुटभर साखर टाकावी. सगळे मिश्रण पुन्हा एकदा नीट हलवून घ्यावे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ येऊ द्यावी.
- साखर टाकल्यावर दुसऱ्यांदा जेव्हा वाफ देतो, तेव्हा गॅस कमी ठेवावा. - ५ मिनिटांनी गॅस बंद करावा. वाफाळता बटाट्याचा किस खाण्यासाठी तयार असेल.
हे देखील करू शकता- आवडत असेल तर तुम्ही यावर लिंबू पिळून खाऊ शकता. किंवा लिंबाचे लोणचे तोंडी लावायला घेऊ शकता.- काही जणांना जर यामध्ये दाण्याचा कुट आवडत असेल तर टाकू शकता. जेव्हा वरील रेसिपीमध्ये आपण साखर टाकतो, तेव्हाच दाण्याचा कुट टाकावा आणि वाफ येऊ द्यावी.