Join us  

Ashadhi Ekadashi :  झटपट तयार होणाऱ्या उपवासाच्या 'या' 5 स्वादिष्ट रेसिपीज् नक्की ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:37 AM

Upvas Recipes Ashadhi Ekadashi : अशावेळी काय खावे किंवा आहार कसा असावा हा सगळ्यात मोठा प्रश्न गृहीणीं समोर असतो.

ठळक मुद्दे अशावेळी काय खावे किंवा आहार कसा असावा हा सगळ्यात मोठा प्रश्न गृहीणीं समोर असतो.

एकादशी, दुप्पट खाशी  हे तुम्ही चांगलंच ऐकून असाल; आज आषाढी एकादशी निमित्तानं अनेकां घरांमध्ये लोकांनी उपवास ठेवला आहे. उपवासाच्या दिवशी रोजच्यापेक्षा वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला जातो.  अशावेळी काय खावे किंवा आहार कसा असावा हा सगळ्यात मोठा प्रश्न गृहीणीं समोर असतो. यासाठीच उपवासाला खाऊ शकाल अश्या रेसीपीज् जाणून घ्या. हे पदार्थ तुम्ही रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर उपवास नसेल तरी, खाऊ शकता. 

1) उपवासाचे बटाटेवडे

साहित्य: तीन बटाटे, शेंगदाणे तेल किंवा साजूक तूप, एक टीस्पून जिरे, एक टेबलस्पून आलं-मिरची पेस्ट, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, राजगिरा, शिंगाडा, साबुदाणा किंवा केळ्याचे पीठ अर्धा कप.

कृती: बटाटे उकडून कुस्करून घ्यावेत. कढईत तेल किंवा तूप घेऊन त्यात जिऱ्याची फोडणी करावी. त्यात आलं मिरची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून स्मॅश केलेला बटाटा परतून घ्यावा. वर दिलेले कोणतेही पीठ घेऊन नेहमीसारखे बटाटेवडे तळावेत.

२) उपवासाचे गुलामजाब

साहित्यः सव्वाशे ग्रॅम खवा, एक टेबलस्पून अरारूटचे पीठ, एक कप साखर, एक कप पाणी, चिमूटभर खायचा सोडा (उपवासाला चालत असेल तर), तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल घेतले तरीही चालेल.

कृतीः माव्यात अरारूटचे पीठ घालून चिमूटभर खायचा सोडा घाला. थोडे दूध घालून मळून घ्या. २०-३० मिनिटं गोळा तसाच ठेवा. नंतर पुन्हा मळून घ्या. छोटे गोळे करून तळून घ्या. साखरेच्या गरम एकतारी पाकात गार गुलाबजाम टाकावेत.

३) उपवासाचा वरीचा पुलाव

साहित्य: एक कप वरीचा तांदूळ, दोन टेबलस्पून तूप, दोन लवंगा, जिरे, दोन- तीन मिरच्यांचे तुकडे, अर्धा इंच आले, साखर व मीठ चवीनुसार, अर्धा कप दाण्याचा कूट, दहा-बारा बेदाणे, अर्धा कप रताळ्याच्या फोडी, कोथिंबीर, दहा-बारा काजूचे तुकडे.

कृती: वऱ्याचे तांदूळ धुवून ठेवावेत. एका मोठय़ा भांडय़ात तूप गरम करून त्यात जिरे, लवंग, मिरचीचे तुकडे घालावेत. वरी तांदूळ घालून अंदाजे पाणी घालावे. त्यात बटाट्याच्या फोडी आणि रताळ्याच्या फोडी घालाव्यात. दाण्याचा कूट, मीठ आणि साखर घालून शिजवून घ्यावे. दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तूप घालून काजू आणि बेदाणे परतून घ्यावेत. हे त्या वरीवर घालून छान मिसळून घ्यावे. कोथिंबीर घालून छान वाफ द्यावी. टीप- सुरणाच्या फोडी, रताळ्याच्या फोडी वेगळ्या शिजवून तुपात थोडय़ा परतून शेवटी वऱ्याच्या तांदळात मिसळल्या तरी चालतात.

४) उपवासाचे थालीपीठ

साहित्य: २ वाट्या साबुदाणा, २ मध्यम बटाटे (शिजवलेले), १/२ वाटी शेंगदाण्यांचा कूट, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा जीरे, १/२ चमचा जीरेपूड, चवीपुरते मिठ, तेल/ तूप, थालिपीठ थापण्यासाठी प्लास्टीकची शिट.

कृती: साबुदाणे पाण्यात भिजवावे. उरलेले पाणी काढून टाकावे. ३-४ तास भिजत ठेवावेत.शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात. भिजवलेला साबुदाणा, शिजवलेले बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, जीरेपूड, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावे. प्लास्टीक शिटला तूपाचा हात लावून गोळे थापावे. थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे. नॉनस्टीक तव्यावर थोडे तूप सोडावे. मिडीयम हाय हिटवर थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस करून घ्यावे. दही, मिरचीचा ठेचा, किंवा लिंबाचे गोड लोणचे यांबरोबर हे थालिपीठ छान लागते.

५) उपवासाचे घावणे

साहित्य: वाटी वरी तांदूळ, १वाटी साबुदाणे, २ हिरव्या मिरच्या, २ चमचे नारळाचा चव, २ चमचे दाण्याचे कूट, १ चमचा जिरे, चवीपुरते मिठ, साजूक तूप.

कृतीः साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे .दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे. नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी बाजू निट होवू द्यावी. गरम गरम घावन नारळाची चटणी सर्व्ह करावे. 

टॅग्स :अन्नआषाढी एकादशी