साऊथ इंडियन पदार्थ आपल्या विशेष आवडीचे असतात. पोटभरीचे, चविष्ट आणि तरीही तेलकट आणि मसालेदार नसल्याने हे पदार्थ सगळ्याच वयोगटात अतिशय आवडीने खाल्ले जातात. एरवी आपण तांदूळ आणि उडदाची डाळ यांच्यापासून केलेल्या पिठाचे आप्पे बनवतो. यामध्ये आवडीनुसार कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर असेही काही ना काही घालतो. मुलं भाज्या खात नसतील तर आपण यात कोबी, गाजर, बीट यांसारख्या भाज्याही घालू शकतो. हे ठिक आहे पण उपवासाच्या दिवशीही आप्पे खाण्याची इच्छा असेल तर उपवासाचेही आप्पे करता येतात. नेहमीच भगर, साबुदाण्याची खिचडी हे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर याच पदार्थांपासून केलेले हे चविष्ट आप्पे एकदा नक्की खाऊन पाहा. श्रावणात तर सोमवार, शुक्रवार असे बरेच उपवास असतात त्या दिवशी करता येईल असा झटपट होणारा हटके पदार्थ कसा करायचा पाहूया (Upwasache Appe Shravan Special Fasting Recipe)..
१. भगर आणि साबुदाणा एका मिक्सरच्या भांड्यात थोडे जाडसर घेऊन चांगला वाटून घ्या.
२. यामध्ये दही घालून पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्सर करा.
३. हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यामध्ये मिरचीचे काप, दाण्याचा कूट, मीठ आणि चवीपुरती साखर घाला.
४. गरज असल्यास थोडेसे पाणी घाला नाहीतर हे मिश्रण साधारण २० ते ३० मिनीटांसाठी झाकून ठेवा.
५. आप्पे पात्रात तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप घालून हे पीठ घालायचे आणि हे आप्पे दोन्ही बाजूने चांगले सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे.
चटणी कशी करायची?
चटणीसाठी मूठभर शेंगादाणे, ओल्या नारळाचे काप, मिरची, साखर आणि मीठ मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यायचे. यामध्ये आवडीनुसार दही किंवा लिंबाचा रस घालून थोडं पाणी घालून हे मिश्रण पुन्हा फिरवायचं. आवडत असेल तर वरुन जिऱ्याची फोडणी द्यायची, नाही दिली तरी चालते.