Join us  

वाड्याचा तांदूळ आणि अलिबागचा कांदा आता जगात भारी! GI ची मोहोर, लोकल ग्लोबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 8:00 AM

आज वाडा कोलम आणि अलिबाग पांढरा कांदा यांना GI मानांकन मिळाले. आता वेळ आलीय आपली जळगांव वांगी, झालेच तर भाकरी, थालीपीठ, इडली आणि घरचे दही यांच्या पेटंटसाठी मागणी करायची. कारण उद्या अशीच कुठली तरी बलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपनी येऊन या सर्वावर हक्क सांगेल आणि आपण त्यांची उत्पादने चूपचाप भक्कम किंमतीला विकत घेत राहू.

- शुभा प्रभू साटम

आमच्या बागेतला आंबा कमाल गोड, आमच्या गावच्या वांग्याचे भरीत काय खाल! गावच्या शेतात पिकणाऱ्या तांदुळाची चव न्यारी! अशी वाक्यं आपण कधी ना कधी ऐकत असतो आणि बरेच अंशी ती सत्य आहेत. मातीचा गुणधर्म असतोच. कृष्णाकाठच्या वांग्याची चव, वसईच्या केळ्याची माधुरी, देवगडच्या हापूसचा गोडवा, सुवास, बिहारची लीची, काश्मीरचे केशर, ईशान्य भारतातील हळद, सगळे एकमेवाद्वितीय!!

फक्त खाणे-पिणेच नव्हेतर, बनारस शालू, येवला पैठणी, महेश्वरची साडी अशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत..त्या-त्या ठिकाणी किंवा भूभागात पिकणारे, होणारे ठरावीक उत्पादन अंगभूत गुणवैशिष्ट्ये घेऊन येते आणि प्रसिद्ध होते. पण त्यामुळे होते काय, त्याची नक्कल सर्रास केली जाते. त्यात हापूस म्हणून कुठलाही आंबा गळ्यात मारला जातो आणि अस्सल पैठणी म्हणून यंत्रमागावर केलेली साडी दाखवली जाते.वरील सर्व गोष्टी पिढ्यानपिढ्या होत आलेल्या आहेत. शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या या वस्तू, उत्पादने त्या ठरावीक प्रदेशाचा मानबिंदू ठरते.

Image: Google

जगात अशा गोष्टींना GI index (भौगोलिक जागतिक मानांकन) दिला जातो. हापूस फक्त कोकणातील आणि लीची बिहारची. तुम्ही जगात कुठेही ही उत्पादने करा; पण त्याचा कॉपिराईट त्या विशिष्ट भूभागाचाच असेल. म्हणजे ते उत्पादन अस्सल आणि कायदेशीर. आताच या यादीत ‘वाडा कोलम’ आणि ‘अलिबाग पांढरा कांदा’ ही कृषी उत्पादने समाविष्ट झाली आहेत. इंटेलिजन्स राईट म्हणजे बुद्धिमत्ता हक्क किंवा पेटंटसारखेच हे मानांकन आहे.

वाडा कोलम तांदूळ हा पालघर, वाडा या ठिकाणी होतो. पूर्ण वाडा तालुक्यात एकूण २५०० हेक्टर जमिनीवर या वाडा कोलमची लागवड होते. पारंपरिक तांदुळाची ही जात तशी नाजूक आणि किडीचा प्रादुर्भाव चटकन होणारी असल्याने अनेक शेतकरी याची लागवड करीत नाहीत; पण या तांदुळाची लज्जत आणि सुवास स्वर्गीय असल्याने देश-विदेशातील दर्दी लोक त्याची मागणी करतात. ६०/७० रुपये किलो किंमत असणाऱ्या या तांदुळाची नक्कल बाजारात सहज होते. अन्य राज्यातील दुय्यम प्रतिचा बारीक तांदूळ वाडा कोलम म्हणून खपवला जातो. साधारणपणे २०१४ पासून या धान्य जातीला GI नामांकन मिळावे याकरिता पालघरमधील शेतकरी आणि सहकारी संघ प्रयत्नशील होते.

Image: Google

वाडा कोलमसारखे दुसरे पीक आहे ते म्हणजे अलिबागमधील पांढरा कांदा. साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये हा कांदा बाजारात येतो. अस्सल अलिबाग कांदा आकाराने मध्यम, पातळ सालीचा आणि चवीला गोड असतो. अर्थात वाडा कोलमप्रमाणे निव्वळ पांढरे हायब्रीड वाण ‘अलिबाग कांदे’ म्हणून विकून ग्राहकाची फसवणूक होते. नागोठणे, अलिबाग येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीपण या कांद्याला GI नामांकन मिळावे ही मागणी होती. तीही पूर्ण झाली. हा कांदा माळेत विकला जातो आणि खूप टिकावू असतो.

हा शेतकऱ्याचा हक्क आहे. काही वर्षे आधी बासमती तांदूळ कुठला यावरून आंतरराष्ट्रीय वाद झाला होता. त्याहीआधी हळदीचे औषधी गुणधर्म पेटंट लंपास करण्याचा अमेरिकन प्रयत्न, डॉ. रघुनाथ माशेलकर आणि तत्कालीन सरकार यांच्या कडव्या विरोधामुळे नष्ट झाला. भारतीय स्वयंपाकात हळद हजारो वर्षे वापरली जातेय आणि जखम भरायला किंवा खोकला-पडसे यावर आयुर्वेद तिची शिफारस करते.‘टकीला’ हे लोकप्रिय मद्य मेक्सिकोमधील टकीला नावाच्या प्रदेशात होते आणि त्यामुळे टकीला नाव अन्य कोणी वापरू शकत नाही, असा नियम आहे. हा एक प्रकारचा GI index आहे.भारतात हजारो गोष्टी, उत्पादने आहेत; जी आता जगात लोकप्रिय होत आहेत. आपण पिढ्यानपिढ्या नाचणी, बाजरी, ज्वारी, वरी ही तृणधान्ये खातोय. तूप, सफेद लोणी वापरतोय. इडली, कांजी असे लॅक्टो फरमेंटेड (नैसर्गिक आंबवलेले) पदार्थ करतोय, कच्च्या घाणीचे तेल घेतोय, जग आज ‘व्हेगन’ आणि ‘ग्लूटेन फ्री’ होतेय. पारंपरिक भारतीय अन्न तसेच आहे.

Image: Google

आज वाडा कोलम आणि अलिबाग पांढरा कांदा यांना GI मानांकन मिळाले. आता वेळ आलीय आपली जळगांव वांगी, झालेच तर भाकरी, थालीपीठ, इडली आणि घरचे दही यांच्या पेटंटसाठी मागणी करायची. कारण उद्या अशीच कुठली तरी बलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपनी येऊन या सर्वावर हक्क सांगेल आणि आपण त्यांची उत्पादने चूपचाप भक्कम किंमतीला विकत घेत राहू. जागो भारतीय जागो...

(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

 

shubhaprabhusatam@gmail.com