Join us  

व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल: आवडत्या माणसासाठी करा गुलकंद शिरा, प्रेमात पाडणारी सोपी सुंदर रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2023 11:12 AM

Valentines Day Special Recipe Gulkand Sheera : प्रेमाचे प्रतिक असलेल्या गुलाबापासून केलेल्या गुलकंदाची खास रेसिपी...

व्हॅलेंटाईन्स डे विकेंडला आला तर ठिक आहे. पण वर्कींग डेच्या दिवशी आला तर मात्र आपल्याला सेलिब्रेशनचे फारसे प्लॅन करता येत नाहीत. संध्याकाळी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी आपण एखाद्या हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये जातो. पण दिवसा ऑफीस किंवा आणखी काही कामं असल्याने आपल्याला विशेष काही प्लॅन करता येत नाही. अशावेळी आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काहीतरी हटके आणि प्रेमाने केलेला एखादा पदार्थ त्याला नक्कीच खूश करु शकतो.

गोड खायला प्रत्येकालाच आवडते आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून ते झटपट होणारे असेल तर फारसा ताणही पडत नाही. आज आपण अशीच एक स्पेशल डीश पाहणार आहोत. ती म्हणजे गुलकंद शिरा. गुलकंद हा प्रेमाचे प्रतिक असलेल्या गुलाबापासून केलेला असल्याने आजच्या खास दिवसाचे निमित्त साधून तुम्ही हा शिरा नक्की ट्राय करु शकता. उन्हाळ्याच्या दिवसांत गुलकंदामुळे शरीराला थंडावा मिळत असल्याने आरोग्यासाठीही हा शिरा अतिशय चांगला असतो. पाहूया गुलकंद शिका कसा करायचा (Valentines Day Special Recipe Gulkand Sheera).

(Image : Google)

साहित्य -

१. रवा - १ वाटी 

२. तूप - पाव वाटी 

३. साखर - पाऊण वाटी 

४. दूध - अर्धी वाटी 

५. चारोळ्या - पाव वाटी 

६. पिस्ते, बदाम काप - पाव वाटी 

७. गुलकंद - अर्धी वाटी 

८. गुलाबी रंग - अर्धा चमचा 

९. वेलची पूड - पाव चमचा 

कृती - 

१. कढईमध्ये तूप घालून मध्यम आचेवर रवा चांगला गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा.

२. मग यामध्ये साखर आणि दूध घालून हे सगळे एकजीव होईपर्यंत हलवायचे. रवा चांगला फुलला की शिरा मोकळा होण्यास सुरुवात होते. गुलकंद गोड असतो त्यामुळे साखर आवश्यकतेनुसार घालावी.

३. त्यानंतर यामध्ये गुलकंद, वेलची पावडर घालून पुन्हा एकजीव करायचे, आवश्यकतेनुसार कडेने पुन्हा तूप सोडायचे. 

४. मग यामध्ये चारोळ्या, बदाम आणि पिस्त्याचे काप आणि आवडत असल्यास थोडा गुलाबी रंग घालायचा आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची.

५. साधारण ५ मिनीटांनी गॅस बंद करुन गरमागरम शिरा खायला घ्यायचा. गुलकंद, सुकामेवा आणि वेलची पूड या सगळ्यामुळे शिऱ्याला एकप्रकारचा मस्त स्वाद येतो. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.