उपवास म्हटलं की आपल्यााल उपवासाचे पदार्थ खायला मिळणार या कल्पनेनेच अनेकांना छान वाटतं. श्रावण महिन्यात सोमवार, शनिवार, शुक्रवार अशा बऱ्याच वारी उपवास करण्याची पद्धत आहे. आपण बहुतांसवेळा उपवासाला साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी नाहीतर उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ असे ठराविक पदार्थच खातो. हे पदार्थ खाऊन आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. त्यापेक्षा घराच सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासूनच थोडे हटके पदार्थ केले तर पोट भरते आणि मनही खूश होते (Varai Poori Easy Recipe for Fasting in Shravan).
विशेष म्हणजे हे पदार्थ करण्यासाठी म्हणावा तितका जास्त वेळ लागत नाही. भगर म्हणजेच वरईपासून तयार केल्या जाणाऱ्या पुऱ्यांची अतिशय सोपी अशी रेसिपी आज आपण पाहणार असून या पुऱ्या खायलाही तितक्याच छान लागतात. पावसाळ्याच्या दिवसांत वातूळ पदार्थ खाण्यापेक्षा पचायला हलके असे पदार्थ आपण आवर्जून खातो. वरई पचायलाही हलकी असल्याने वरईपासून या उपवासाच्या पुऱ्या नेमक्या कशा करायच्या पाहूया.
१. अर्धी वाटी भगर मिक्सर मधून बारीक करुन त्याचे पीठ करुन घ्या.
२. भगरीच्या या पिठात १ उकडलेला बटाटा किसून घ्या
३. यामध्ये १ चमचा ठेचलेली हिरवी मिरची, मीठ, १ चमचा लाल तिखट घाला आणि सगळे चांगेल मळून घ्या.
४. हे पीठ मळताना पाण्याची आवश्यकता लागत नाही. यामध्ये आवडीप्रमाणे थोडे दही, साखर, लिंबू, दाण्याचा कूट, जीरे असे काहीही घालू शकता.
५. हे पीठ भिजवल्यानंतर १५ मिनिटे तसेच झाकून ठेवा आणि मग हाताला थोडे पाणी लावून मळून घ्या
६. एकसारख्या गोलाकार पुऱ्या लाटा आणि कढईतील तेल चांगले गरम करुन या पुऱ्या तेलात खरपूस तळून घ्या.
७. या पुऱ्या दाण्याची चटणी, काकडीची कोशिंबीर, दही, लिंबाचे लोणचे अशा कशासोबतही अतिशय छान लागतात.