नाश्त्याला खाऊन खाऊन कंटाळा आलेले पदार्थ असले की मूडच जातो. काहीतरी वेगळं हवं असं आपल्यासह घरातल्या सगळ्यांचंच म्हणणं असतं. पण वेगळं काही करायचं म्हटलं की त्यासाठी हाताशी वेळ हवा, तशी सामग्री घरात हवी. पण आहे त्या सामग्रीतच काही वेगळं आणि चविष्ट करता येतं. घरात बेसनपीठ तर प्रत्येकाच्याच घरात असतं. अशा या बेसनाचा पौष्टिक आणि चविष्ट नाश्त्याचा पदार्थ म्हणजे बेसनाचं ऑम्लेट. महत्त्वाचं म्हणजे बेसनाचं ऑम्लेट हा काही फक्त नाश्त्याचाच पदार्थ नाही. रात्रीच्या जेवणाला वेगळं म्हणून हे ऑम्लेट करता येतं. बेसनाचं ऑम्लेट चविष्ट करण्यासाठीची ही खास रेसिपी
Image: Google
बेसन पिठाचं ऑम्लेट
बेसनाचं ऑम्लेट तयार करण्यासाठी 2 वाटी बेसन पीठ,1 मोठा कांदा, 2 टमाटे, 2 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, एक छोटा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि ऑम्लेट शेकण्यासाठी तेल एवढ्या सामग्रीची गरज असते.
बेसन पिठाचं ऑम्लेट करताना सर्वात आधी कांदा, टमाटे, मिरच्या, कोथिंबीर अगदी बारीक चिरुन घ्यावं. मग बेसन पिठात ओवा हातावर चांगला चोळून घालावा. तो बेसन पिठात आधी नीट मिसळला की मग त्यात मीठ, तिखट, चाट मसाला, गरम मसाला घालावा. हे सर्व बेसन पिठात नीट मिसळून घ्यावं. मसाले मिसळले गेले की मग त्यात बारीक चिरलेले सर्व जिन्नस घालावं. ते मिसळलं गेलं की बेसन पीठ पाण्यानं सरबरीत भिजवावं. मिश्रण अगदी घट्ट असलं तर ऑम्लेट आतून नीट शिजत नाही आणि कच्चं लागतं. आणि खूप पातळ केलं तर त्याची चव बदलते. या मिश्रणात आवडत असल्यास थोडं आलं किसून घ्यावं. मिश्रण नीट मिसळलं गेलं की नॉन स्टिक तव्यावर किंवा लोखंडाच्या तव्यावर मिश्रणाचे ऑम्लेट घालावेत.
Image: Google
नॉन स्टिक तव्यावर ऑम्लेट छान पातळ घातलं जातं आणि भाजताना चिटकण्याचा, जळण्याचा धोकाही नसतो. पण जर लोखंडाच्या तव्यावर बेसनाचं ऑम्लेट करायचं अस्ल्यस आधी संपूर्ण तव्याला चांगलं तूप लावावं. मग गोल चमच्यानं तव्यावर बेसनाचं मिश्रण घालून ते हलक्या हातानं पसरवावं. मिश्रण तव्यावर घातलं की पुन्हा थोडं तूप किंवा तेल घालावं. बाजूच्या कडा सुटल्या की मग ते उलटून दुसर्या बाजूनेही शेकून घ्यावं.
Image: Google
ओल्या नारळाची कोथिंबीर आणि पुदिना घातलेली आंबट गोड चटणी या बेसनाच्या ऑम्लेटसोबत छान लागते.बेसन पिठात प्रथिनं असतात. त्यामुळे बेसनाचं ऑम्लेट खाल्लं की लगेच ऊर्जा मिळते. तसेच बेसनाच्या ऑम्लेटमधे ग्लूटेन नसतं. त्यामुळे ज्यांना गव्हाच्या पिठातल्या ग्लुटेनची अँलर्जी असते त्यांना बेसनाचे ऑम्लेट चालते. तसेच बेसनातले घटक अँण्टिऑक्सिडेण्टसारखे काम करतात. म्हणून बेसनाचं ऑम्लेट हे फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही उत्तम आहे.