बरेचदा आपण रात्री जेवायला किंवा विकेंडला पूर्ण स्वयंपाक न करता फक्त भात करतो. यातही भाताचा वेगळा प्रकार असेल तर त्याच्यासोबत पापड लोणचं आणि आवर्जून असायला हवा असा पदार्थ म्हणजे रायतं. सॅलेड प्रत्येक जेवणात असायलाच हवं असं आपण नेहमी ऐकतो. सलाडमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्याने अन्नपचनाची क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. इतकंच नाही तर सॅलेडमळे जेवणाचा स्वाद वाढतो तो वेगळाच. आपण नेहमी सॅलेड चिरुन घेतो किंवा त्याची कोशिंबीर करतो (Veg Raita Salad Recipe).
पण दही घालून रायतं आपण कधीतरीच करतो. हेच रायतं परफेक्ट व्हावं आणि आपल्या जेवणाची रंगत वाढावी म्हणून आज आपण ही खास रेसिपी पाहणार आहोत. बिर्याणी, पुलाव, मसालेभात, खिचडी अशा कोणत्याही प्रकारच्या भातासोबत हे रायतं फार सुंदर लागतं. उन्हाळ्याच्या दिवसांत तर तोंडाला चव नसते अशावेळी गारेगार रायत्यामुळे जेवणाला आणखीनच रंगत येते. पाहूया अगदी १० मिनीटांत होणारं परफेक्ट रायतं करायचं तरी कसं.
साहित्य -
१. काकडी - १
२. टोमॅटो - १
३. कांदा - १
४. दही - १ वाटी
५. मीठ - चवीनुसार
६. साखर - चवीनुसार
७. जीरे पूड - पाव चमचा
८. काळे मीठ - पाव चमचा
९. चाट मसाला - पाव चमचा
१०. तिखट - पाव चमचा
११. कोथिंबीर - अर्धी वाटी (बारीक चिरलेली)
कृती -
१. कांदा, टोमॅटो आणि काकडी बारीक चौकोनी चिरुन घ्यायची.
२. हे सगळे एका बाऊलमध्ये घेऊन त्यावर कोथिंबीर घालायची.
३. मग मीठ, काळं मीठ, चाट मसाला, तिखट, जीरेपूड, साखर घालायची.
४. सगळ्यात शेवटी चांगलं फेटलेलं घट्टसर दही घालायचं.
५. हे मिश्रण चांगलं एकजीव करायचं आणि बिर्याणी किंवा पुलावासोबत खायला घ्यायचं.
६. आंबट गोड चवीमुळे हे रायतं सगळ्यांनाच आवडतं आणि लागतंही तितकंच छान. नेहमीच्या जेवणातही आपण कोशिंबीरीऐवजी हे रायतं घेऊ शकतो.
७. यामध्ये आपण काकडी आणि टोमॅटो ऐवजी बीट, कोबी, गाजर, डाळींबाचे दाणे, खारी बुंदी अशा आपल्या आवडीचे कोणतेही सॅलेड घेऊ शकतो.