Join us  

भरपूर भाज्या घालून करा पौष्टीक दलिया; थंडीत ब्रेकफास्टचा झटपट-उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 10:05 AM

Vegetable Dalia Recipe for Breakfast : बाजारात भरपूर भाज्या उपलब्ध असल्याने आपण भाज्यांपासून करता येणारे बरेच पदार्थ ट्राय करु शकतो.

ठळक मुद्देघरात उपलब्ध असतील त्या कोणत्याही भाज्या घालून आपण हा दलिया करु शकतो.थंडीच्या दिवसांत भरपूर ऊर्जा देणारा आणि पौष्टीक दलिया नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला करता येईल.

रोज नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न महिला वर्गाला कायम पडलेला असतो. सारखे पोहे, उपमा, शिरा करुन कंटाळा आला की घरातील मंडळींनाही वेगळं आणि चविष्ट काहीतरी हवं असतं. तर लहानग्यांच्या आणि मोठ्यांच्याही पोटात पौष्टीक काहीतरी जायला हवं असं आपल्याला वाटत असतं. या दोन्हीचा मध्य काढून नाश्त्याला वेगवेगळे पर्याय आपण करत असतो. थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. तर बाजारात भरपूर भाज्या उपलब्ध असल्याने आपण भाज्यांपासून करता येणारे बरेच पदार्थ ट्राय करु शकतो. गव्हाच्या दलियापासून झटपट होणारा दलिया करा करायचा ते पाहूया (Vegetable Dalia Recipe for Breakfast)...

साहित्य -

१. दलिया - २ वाटी 

२. मटार - पाव वाटी 

३. गाजर - पाव वाटी

(Image : Google)

४. फ्लॉवर - पाव वाटी

५. कांदा - १ 

६. शिमला मिरची - १

७. फरसबी - पाव वाटी 

८. फोडणीचे साहित्य 

९. धणे-जीरे पावडर - अर्धा चमचा 

१०. गोडा मसाला - अर्धा चमचा 

११. तिखट - अर्धा चमचा 

१२. साखर - अर्धा चमचा 

१३. मीठ - चवीनुसार 

१४. तेल - २ चमचे 

१५. कडीपत्ता - ८ ते १० पाने 

१६. कोथिंबीर - अर्धी वाटी 

कृती - 

१. एका भांड्यात दलिया घेऊन त्यामध्ये पाणी घालून कुकरला भाताप्रमाणे ३ ते ४ शिट्ट्या कराव्यात.

२. कांदा, शिमला मिरची, गाजर, फरसबी, फ्लॉवर सगळे उभे चिरुन घ्यावे.

३. कढईत तेल घालून त्यामध्ये मोहरी-जीरे घालून चांगले तडतडू द्यावे. त्यानंतर हिंग , हळद घालावे.

(Image : Google)

४. फोडणीमध्ये कडीपत्ता घालून त्यानंतर कांदा घालून चांगले परतून घ्यावे.

५. मग मटार, फ्ल़ॉवर, गाजर, शिमला, फरसबी सगळ्या भाज्या घालून त्यावर झाकण ठेवून १ वाफ काढून घ्यावी. 

६. झाकण उघडून यामध्ये तिखट, गोडा मसाला, धणे-जीरे पावडर, साखर आणि मीठ घालून सगळे एकजीव करावे. 

७. यामध्ये शिजलेला दलिया घालून पुन्हा सगळे एकजीव करुन घ्यावे.

८. झाकण ठेवून १ वाफ आणावी आणि नंतर डीशमध्ये घेऊन त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हा दलिया खायला घ्यावा.   

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.