उन्हाळा जवळ आला की भाज्या महागतात. एरवी १० रुपये अर्धा किलो मिळणारी भाजी उन्हाळ्यात १५ ते २० रुपये पाव किलोने मिळते. आपला मुख्य आहार भाजी आणि पोळी किंवा भाजी आणि भात असल्याने भाज्यांशिवाय आपल्याला पर्याय नसतो. इतकेच नाही तर उन्हाळ्यात भाज्या आणल्या तरी लगेच वाळून जातात. उन्हामुळे त्या २ दिवसांत इतक्या वाळतात की शेवटी त्या वाया जातात. आता शरीराचे पोषण तर व्हायला हवे. तसेच उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना तोंडाचीही चव गेलेली असते. अशावेळी तोंडाला चव येण्यासाठी आणि जेवण लज्जतदार होण्यासाठी भाजीला पर्याय म्हणून गोळा आमटी हा उत्तम पर्याय ठरतो. विदर्भातील हा पदार्थ आता राज्याच्या सर्व भागात केला जातो. पाहूया कशी करायची गोळा आमटी...
साहित्य -
१. कांदा - २ लहान
२. टोमॅटो - १
३. आलं लसूण पेस्ट - १ चमचा
४. गोडा मसाला - अर्धा चमचा
५. धने-जीरे पावडर - अर्धा चमचा
६. तिखट - अर्धा चमचा
७. गूळ - चवीनुसार
८. मीठ - चवीनुसार
९. कोथिंबीर - अर्धी वाटी
१०. हरभरा डाळ - १ वाटी
११. तेल - २ चमचे
१२. मोहरी, जीरे, हिंग, हळद - फोडणीसाठी
साहित्य -
१. हरभरा डाळ पाण्यात भिजवून मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घ्यायची.
२. या डाळीत तिखट, मीठ घालून त्याचे वडे करुन त्याला कुकरमध्ये वाफ काढून घ्यायची.
३. कांदा टोमॅटो आलं लसूण मिक्सरमधून वाटून त्याची बारीक पेस्ट करायची.
४. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी, जीरे, हिंग हळद घालून फोड़णी करायची.
५. या फोडणीत कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट घालून ती चांगली परतून घ्यायची.
७. त्यामध्ये तिखट, मसाला, धने जीरे पूड घालून सगळे एकजीव करायचे.
८. हे सगळे चांगले परतून झाल्यावर त्यामध्ये पाणी घालून वाफवलेले वडे घालावेत.
९. यामध्ये आवडीनुसार गूळ आणि चवीपुरते मीठ घालून याला चांगली उकळी येऊ द्यावी.
१०. उकळी आल्यावर वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम गोळा आमटी पोळी किंवा भाकरीसोबत खायला घ्यावी.