शुभा प्रभू साटम
कबाब म्हटलं की ते निव्वळ मांसाहारी असतात असे बिलकुल नाही. १००टक्के शाकाहारी कबाब करतात येतात. त्यातलाच हा एक प्रकार. हे कबाब घरी, तेही सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहू. साबुदाणा आणि बटाटा हे आवडणारे, उपवासाला चालणारे पदार्थ घेऊन आपण हा साबुदाणा बटाटा सीख कबाब बनवणार आहोत.
साहित्य नेहमीचीच असलं तरी हा पदार्थ चवीला वेगळा लागेल आणि पावसाळी, हिवाळी हवेत तर अत्यंत रुचकर, चमचमीत असा. खाण्याची चंगळ.
साहित्य
साबुदाणे पाव वाटी भिजवून.
बटाटा २ मध्यम उकडून सोलून किसून.
बिट १ उकडून- सोलून- किसून
दाणे कूट थोडेसे अथवा १०/१२ काजूची भरड पूड
कोणताही शाही बिर्याणी गरम मसाला चवीनुसार,
आले, मिरची, लसूण, कोथिंबीर, पुदीना, बारीक चिरून
लिंबू रस/आमचूर
मीठ,साखर
हळद आणि लाल तिखट
कृती
सर्व साहित्य एकत्र करावे
मिश्रण घट्ट हवे.
लांबट गोळे करून त्यात लाकडी स्क्यूएर खुपसून सारखे करावे. स्क्यूएर नसतील तरीही हरकत नाही, लांबट चपटे गोळे करून दहा एक मिनिटे फ्रीजमध्ये उघडे ठेवावे.
पॅनमध्ये तूप गरम करून दोन्ही बाजूने लालसर होईतो खरपूस भाजून घ्यावे.
हे कबाब तळायचे नाहीत.
बाहेरून कुरकुरीत हवे असल्यास, रवा/ब्रेड क्रंप्स/शेवई चुरा यापैकी काहीही वरून लावू शकता.
सोबत पुदीना चटणी द्यावी. झाले तयार कबाब.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)