Join us  

वाडा कोलम तांदुळाला मिळाला GI इंडेक्सचा मान! अस्सल वाडा कोलम कसा ओळखायचा? घ्या ‘लोकल’ टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2021 2:41 PM

सुगंधी, मुलायम, रुचकर, पचनाला हलका असलेल्या या तांदुळात स्टार्च, जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि कर्बोदकांचं प्रमाण भरपूर असतं. कसदार आहारासाठी जेवणात वाडा कोलम भात असणं म्हणूनच गरजेचं आहे असं तज्ज्ञ म्हणतात.

ठळक मुद्देसंपूर्णपणे सेंद्रिय वाणाचा असं वाडा कोलमचं खास वैशिष्ट्य आहे.बारीक दाणा, सुगंधित, चविष्ट कसदार असलेला हा तांदुळ शिजवल्यावर त्याचा भात एकदम मऊ मुलायम होतो. अस्सल वाडा कोलम तांदूळ शिजल्यावर आपल्या सुगंधानं, चवीनं आणि मऊ पोतानं खाणार्‍याला प्रेमात पाडतोच.

भात प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. वाड कोलम या जातीच्या तांदुळाला ‘GI’ ( (wada kolam GI) जिऑग्राफिकल इंडिकेशन मानांकन अर्थातच भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या GI मानांकनामुळे खवय्यांना अस्सल वाडा कोलम जातीचा भात खायला मिळेल. सध्या बाजारात वाडा कोलमच्या नावाखाली दुसर्‍या जातीचा तांदूळ विकला जाऊन फसवणूक होत होती. त्यामुळे असा भात प्रत्यक्षात शिजवून खाताना खवय्यांचा मात्र अपेक्षाभंग होत असे. वाडा कोलम वाणाच्या तांदळाची जी वैशिष्ट्ये सांगितली जातात, ती प्रत्यक्षा अनुभवण्यास मिळत नसल्याने नाराजी निर्माण होत होती. तिकडे अस्सल वाडा कोलम वाणाच तांदूळ पिकवणार्‍या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेतकर्‍यांचं मात्र नुकसान होत होतं. कष्टानं पिकवलेल्या दर्जेदार तांदुळाकडे ग्राहक पाठ फिरवत होते.त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी वाडा कोलमचं उत्पादन घेण्यास थांबवलं होतं. या पार्श्वभूमीवर वाडा कोलम तांदळाला जी आय मानांकन मिळावं यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु होते. या प्रयत्नांना 29 सप्टेंबरला यश मिळालं आणि वाडा कोलमला जीआय मानांकन मिळालं.

Image: Google

आज वाडा तालुक्यातील 180 गावांमधे 2,500 शेतकरी वाडा कोलमचं उत्पादन घेतात. वाडा तालुक्यात कोलम जातीच्या तांदळाची लागवड शेकडो वर्षांपासून होते. केवळ वाडा तालुक्यातच हा तांदूळ पिकतो. सुगंधी, मुलायम, रुचकर, पचनाला हलका असलेल्या या तांदुळात स्टार्च, जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि कर्बोदकांचं प्रमाण भरपूर असतं. कसदार आहारासाठी जेवणात वाडा कोलम भात असणं म्हणूनच गरजेचं आहे असं तज्ज्ञ म्हणतात.

Image: Google

फार पूर्वीपासून वाडा तालुक्याला तांदळाचं कोठार मानलं जातं. वाडा तालुक्यातील गावांमधे वाडा कोलमच्या सुरती आणि झिणी जातीची लागवड केली जाते. वाडा तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तेथील पालापाचोळा, शेतकर्‍यांकडे मोठया प्रमाणत असलेल्या जनावरांचं शेणखत अशा नैसर्गिक खतांचा वापर करुन उत्पादित केलेल्या या तांदुळात रसायनांचा अजिबात वापर होत नाही. संपूर्णपणे सेंद्रिय वाणाचा असं वाडा कोलमचं खास वैशिष्ट्य आहे.बारीक दाणा, सुगंधित, चविष्ट कसदार असलेला हा तांदुळ शिजवल्यावर त्याचा भात एकदम मऊ मुलायम होतो. पानात वाढल्यावर हा भात वरण, रस्सा, कालवण लगेच शोषून घेतो. हा भात खूप पांढरा नसतो. पण भात शिजल्यावरभाताची चव आणि सुवास दोन्ही मोहित करतात.

Image: Google

चांगला तांदूळ म्हणजे त्यात बासमती, आंबेमोहोर अन सुवासिक तांदळाचीच गणती व्हायची. खवैय्यांनाही असाच तांदुळ आवडतो. पण वाडा कोलम या सर्व तांदुळांपेक्षा वेगळा आणि विशेष आहे. अस्सल वाडा कोलम तांदुळ शिजल्यावर आपल्या सुगंधानं, चवीनं आणि मऊ पोतानं खाणार्‍याला प्रेमात पाडतोच. भात हवा तर वाडा कोलमचाच अशा अनेकांच्या निश्चयामागे वाडा कोलमच्या भाताची वैशिष्ट्य आहे. वाडा कोलमला मिळालेल्या जी आय मानांकनामुळे आता ग्राहकांना, जातीच्या खवय्यांना अस्सल वाडा कोलम खायला मिळेल हे नक्की.