Join us  

सॅण्डविच तर खायचंय पण ब्रेड नको? हे घ्या नो ब्रेड सॅण्डविचचे 3 टेस्टी प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2022 4:59 PM

नो ब्रेड सॅण्डविच चविष्ट तर लागतंच सोबत ते पौष्टिकही असतं. लेट्यूस, सफरचंद आणि सिमला मिरचीचा वापर करत ब्रेडशिवाय सॅण्डविच खाण्याची आपली इच्छा पूर्ण होवू  शकते.

ठळक मुद्देलेट्यूसचं सॅण्डविच करताना सॅण्डविचचं सारण लेट्यूसमध्ये ठेवून पान सारणाभोवती गुंडाळावं.सफरचंदाचं सॅण्डविच सर्वांना आवडेल एवढं चविष्ट लागतं. सिमला सॅण्डविच ओव्हनमध्ये बेक करुन छान लागतं. 

सॅण्डविच हा नाश्त्याचा किंवा संध्याकाळची भूक भागवण्याचा हलका फुलका सोपा प्रकार. सॅण्डविच करायचं म्हटलं तर आधी घरात ब्रेड हवं. घरात ब्रेड नसलं तर सॅण्डविचचं इतर साहित्य घरात असूनही सॅण्डविच करण्याचा पर्याय कॅन्सल करावा लागतो. तर कधी कधी उलटं होतं सॅण्डविच तर खायचं असतं पण ब्रेड खायचा कंटाळा आलेला असतो. पण ब्रेडशिवाय सॅण्डविच कसं होणार.. म्हणून इच्छा नसतानाही ब्रेड खावा लागतो. पण या दोन्ही अडचणी सोडवण्याचा पर्याय  म्हणजे नो ब्रेड सॅण्डविच. या प्रकारात सॅण्डविच तर खायचं पण ब्रेडशिवाय. हे नो ब्रेड सॅण्डविच चविष्ट तर लागतंच सोबत ते पौष्टिकही असतं. नो ब्रेड सॅण्डविचचे अनेक प्रकार  आहेत. लेट्यूस, सफरचंद आणि सिमला मिरचीचा वापर करत ब्रेडशिवाय सॅण्डविच खाण्याची आपली इच्छा चव आणि पौष्टिकता सांभाळून  पूर्ण होवू  शकते. 

Image: Google

लेट्यूस सॅण्डविच

एरवी ब्रेडच्या सॅण्डविचमध्ये लेट्यूसची पानं ठेवली जातात. त्यावर काकडी, टमाटा, कांद्याचे काप ठेवले जातात. पण लेट्यूस वापरुन नो ब्रेड सॅण्डविच करण्यासाठी लेट्यूसच्या पानात आपल्याला आवडेल ते सॅण्डविचचं सारण भरावं. लेट्यूसचं पानं सारणाभोवती गुंडाळावं. पानाचा खालचा आणि वरचा भाग हलू नये यासाठी त्यामध्ये टूथपिक खोचावी,  हे सॅण्डविच संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भूकेसाठी उत्तम असतं. 

Image: Google

सफरचंदाचं सॅण्डविच

सफरचंदाचं सॅण्डविच हा प्रकार मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना आवडेल  इतका चविष्ट आणि पौष्टिकसुध्दा असतो. सफरचंदाचं सॅण्डविच करण्यासाठी आधी टमाटा, कांदा, काकडीचे पातळ काप करावेत. हे सर्व एका भांड्यात एकत्र करावं. त्यात थोडं मेयोनीज घालावं. सफरचंदाचे गोल काप करावेत. एका प्लेटमध्ये सफरचंदाची गोल काप ठेवावी. त्यावर लेट्यूसचं पान ठेवावं. नंतर यावर मेयोनीज घातलेलं सारण ठेवावं. शेवटी सफरचंदाची आणखी गोल काप ठेवावी. सफरचंदाचं हे सॅण्डविच चविष्ट लागतं.

Image: Google

सिमला मिरची सॅण्डविच

सिमला मिरची मधोमध कापून नो ब्रेड सॅण्डविच करता येतं. यासाठी आधी सिमला मिरची मध्यभागी कापून घ्यावी. त्यातील बिया काढून टाकाव्यात. मोकळ्या सिमला मिरचीत आपल्या आवडीचं सारण भरावं. सिमला मिरचीचं सॅण्डविच करताना मोहरी मिक्सरमध्ये वाटून मेयोनीजमध्ये फेटून घ्यावी. मोहरीचं हे मिश्रण सिमला मिरचीच्या मोकळ्य भागाला लावावं. त्यात सारण भरावं. वरुन चीजची स्लाइस पसरुन ठेवावी. हे सॅण्डविच ओव्हनमध्ये बेक करुन छान लागतं. 

  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीआहार योजना