Join us  

मातीच्या भांड्यात स्वयंपाक करायचा आहे? भांडी निवडाल कशी, कोणते पदार्थ करणं सोपं? स्वच्छता कशी कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 6:38 PM

मातीची भांडी आता ऑनलाइनही मिळतात, पर्यावरण पूरक म्हणून त्यात स्वयंपाकही होतो, पण ती भांडी नक्की वापरला कशी? 

ठळक मुद्देअसते. मातीच्या भांड्यात आद्रता धरून ठेवण्याचा गुणधर्म असल्याने त्यात अन्न खराब होत नाही आणि बराच वेळ गरम राहते.

शुभा प्रभू साटम

मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचा सध्या मोठा ट्रे्ण्ड आहे. त्यासाठी क्लासेसही अनेकजणी लावतात. हौसेपोटी ऑनलाइन मातीची भांडीही विकत घेतली जातात. गाडगी मडकी असणारा संसार किंवा घर हे काही वर्षे आधी गरिबीचे मानक होते.जशी भाकरी चटणी गरिबाचे खाणे मानले जायचे तसेच..पण कालचक्राचा महिमा अगाध. म्हणून जेहत्ते काळाच्या ठायी हलली मातीची ही भांडी जबरदस्त मागणीत आहेत.एकूणच जुने जे जे होते ते ते परत आले आहे. गेल्या काही महिन्यात तर प्रचंड.आपण फार म्हणजे फारच तोल गमावला आहे असे कुठ तरी लोकांना वाटून एकूणच आयुष्याच्या घडणीत बदल होत आहेत.घरचे खाणे,जुन्या स्वयंपाक पद्धती,पुन्हा वापरात येताहेत.आणि मातीची भांडी त्यातील एक.इतके की अमेझॉन सारख्या महाकाय उद्योगाने पण seasoned Earthen pots म्हणून भांडी विक्रीला ठेवलीत. फक्त भांडी नव्हे तर ताटे,वाट्या,पेले,जग,कप ,चमचे...इन थिंग.मातीची भांडी भारतात नवीन नाहीत,किबहूना आजही गाव खेड्यात,आदिवासी पाड्यात मातीची भांडी,गाडगी,मडकी बहुल्याने आढळतील.भारतात अनेक ठिकाणी उष्ण तापमान असते. मातीच्या भांड्यात आद्रता धरून ठेवण्याचा गुणधर्म असल्याने त्यात अन्न खराब होत नाही आणि बराच वेळ गरम राहते. माठात पाणी त्यामुळेच ठेवतात.

तर  फक्त दही लावायला किंवा पिण्याचे पाणी साठवणे इतकाच उपयोग नसून नॉनस्टिक तवे, कढया , टोप पण मातीचे असतात.अगदी छान नक्षीकाम केलेले देखणे असे.आणि त्यात स्वयंपाक कसा करायचा यासाठी चक्क वर्ग घेतले जातात.आपल्या आज्या, पणज्या जे शेकडो वर्षे करत आल्या आहेत, त्याला आता अशी मान्यता मिळाली आहे. मातीच्या भांड्यात आग सगळीकडे समान लागते, अन्न सारखे गरम करावे लागत नाही,मुख्य म्हणजे अल्युमिनियम किंवा हिंडालियम या धातूच्या भांड्या मुळे शरीराला अपाय होवू शकतो तसे मातीच्या भांड्याचे नसते. परत तांबा पितळेच्या भांड्यासरखे कल्हई करा, चिंचेने घासा अशी कटकट नाही आणि स्वस्त..म्हणून नॉनस्टिक तवा बाजूला जावून मातीचा पारंपरिक तवा ,आधुनिक रूपात गॅस हब वर विराजमान झालाय. त्याच्या दुसऱ्या बाजूला हंडीत हातसडीचा आंबेमोहोर शिजतोय, दुसऱ्या कढईत भाजी होतेय ,आणि हे सर्व मातीच्या देखण्या प्लेट मधे वाढले जातेय.बाजूला मातीचे पेले,तांबे ,जग..जग पार ३६० कोनात यु टर्न घेते झालेय आहात कुठं!!याचे पूर्ण फायदे नक्की काय तर अपाय काही नाही हे नक्की. पर्यावरणपूरक आहेत.. परत गावात घडवलेली भांडी चलनात येवून त्याचाही फायदा होतोय. लोकांना पण थोडे आरोग्यपूर्ण वागतोय याचे समाधान.अडगळीत गेलेल्या अनेक जुन्या गोष्टी परत आल्यात..अर्थात किती टिकतील ते माहीत नाही ,पण तोपर्यंत मातीच्या कुल्हड मधील मस्त आले घातलेला चहा प्यायला काहीही हरकत नसावी. न जाणो उद्या एखादा मॅकडोनाल्ड नाहीतर स्टार बक वाला त्याच्यावर हक्क घेवून आपल्याच गळ्यात, मसाला चाय लाते इन अर्थन पॉट म्हणून कचकचीत किमतीला मारेल..

1. मातीची भांडी विकत आणताना काय विचार करायचा?

मातीची भांडी घेताना त्याचा तळ/बुड बघावा.तो जाड हवा..नाहीतर उष्णतेने भांडे तडकू शकते. फार नक्षीकाम असणारी भांडी शक्यतो टाळावी. त्यात उष्टे अडकून राहू शकते.

2. ती हाताळायची कशी?

भांडी आणल्यानंतर ती किमान२४तास पाण्यात पूर्ण बुडवून ठेवावी.यालाच भांडे सिद्ध(seasoned) करणे म्हणतात. मोठ्या कंपनी seasoned भांडी देतात तरही ही काळजी घ्यावी.

3.स्वयंपाकयोग्य कशी करायची?

मातीचा तवा जर काचऱ्या इत्यादी साठी वापरणार असाल,किंवा टोप,कढई अशी भांडी, चोवीस तास बुडवून झाल्यावर, धुवून पुसून कोरडी करावी आणि त्यावर तेल घालून मोठा कांदा लाल करावा.दुसरे महत्वाचे म्हणजे भांडे कधीही गॅसवर तेल घालूनच गरम करायचे.आधी गरम करू नये. ती फुटू शकतात.

4.त्यात काय शिजवायचे नाही?

काहीही शिजवू शकता. निर्बंध नाही.

5. स्वच्छता?

काम झाले की कडकडीत पाणी ओतून स्वच्छ करावी. तेलाचा तवंग,अन्नकण निघून येतात.भांडी सच्छिद्र असल्याने तिथं अन्नकण राहण्याची शक्यता असते. म्हणून गरम पाणीच घ्यावे.

(लेखिका खाद्य संस्कतीच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :अन्नपाककृती