पराठा म्हटला की डोळ्यासमोर येतो तो बटाट्याचा पराठा. चविष्ट बटाट्याचा पराठा कधीही खायला द्या ना कोणाचीच नसते. पण नेहेमी फक्त बटाट्याचा पराठा खाणं हे आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर नाही. पण बटाट्याच्या पराठ्यापेक्षा दुसरा पराठा खायला आवडत नाही ही अडचण असते. पण ही अडचण सोडवण्यासाठी सोयाबिनचा पौष्टिक आणि चविष्ट पराठा हा उत्तम पर्याय आहे. सोयाबीन पराठा करायला अगदीच सोपा आहे.
छायाचित्र- गुगल
सोयाबीन पराठा कसा करावा?
सोयाबीन पराठा करण्यासाठी 2 कप कणिक, आवश्यकतेनुसार पाणी, चवीपुरतं मीठ. सहा चमचे तेल , 1 कप सोयाबीन, 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हिंग, 1 बारीक चिरलेली मिरची, 1 कांदा बारीक चिरलेला, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 इंच किसलेलं आलं घ्यावं.
सोयाबीन पराठा करताना सोयाबीन आधी गरम पाण्यात भिजत घालावेत. ते भिजले गेले की ते पिळून घ्यावेत आणि मिक्सरमधून थोडेसे जाडेभरडे वाटून घ्यावेत. वाटलेले सोयाबीन एका भांड्यात काढावेत. नंतर यात कणिक, तेल आणि सारणासाठी वर सांगितलेले सर्व मसाले घालावेत. हे सर्व नीट मिसळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पराठ्यांची कणिक मळून घ्यावी.
सोयाबीन पराठा पीठ मळून झाल्यावर किमान पंधरा ते वीस मिनिटं ते झाकून ठेवावं. त्यानंतर पीठाची एक छोटी लाटी घेवून त्याचा पराठा लाटून तो तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल लावून बटाट्याच्या पराठ्याप्रमाणे शेकून घ्यावा. हा पराठा शेंगदाण्याची दही घालून केलेली ओली चटणी, खोबर्याची आंबट गोड चटणी किंवा टमाट्याच्या सॉससोबत छान लागतो.
छायाचित्र- गुगल
सोयाबीन वड्यांचा सारणाचा भरलेला पराठाही करता येतो. त्यासाठी कणिक तेल मीठ घालून् मळून घ्यावी. सोयाबीन वड्या गार पाण्यात रात्रभर भिजत घालाव्यात. दुसऱ्या दिवशी सकाली त्या पाण्यातून काढून् पिळून घ्याव्यात. मिरची, आलं, हिंग. हळद, तिखट, मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्याव्या. त्यात चिरलेली कोथिंबीर घालावी. पीठाच्या दोन लाट्या जाड्सर लाटून् घ्याव्यात. एका पोळीवर सोयाबीनचं सारण पसरुन घालावं. त्यावर दुसरी पोळी ठेवून कडा वळवून बंद करुन घ्याव्यात. हा पराठा दोन्ही बाजुंनी तेल घालून खरपूस शेकून घ्यावा.