अनेकांना कितीही जेवलं तरी लगेच भूक लागते, जेवल्याचं समाधानच मिळत नाही. जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे दूध, खव्याचे गोड पदार्थ खाल्ले जातात. विकतच्या मिठाया खाऊन जेवल्यानंतरची गोड खाण्याची इच्छा भागवली जाते. यामुळे भूक भागेते, पोट भरल्यासारखं वाटतं. पण हे नेहमीचंच असल्यानं या सवयीमुळे मात्र त्याचा वजनावर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यासाठी त्यावर योग्य उपचार घ्यायला हवेत नाहीत या गोड खाण्याच्या इच्छेवर आरोग्यदायी पर्याय शोधावा. डाॅक्टरांकडे जाऊन अशा सवयीचं योग्य निदान होणं जितकं गरजेचं तितकंच या शुगर क्रेव्हिंगसाठी योग्य पदार्थ शोधणं देखील महत्त्वाचं .जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा निर्माण होते, ती भागवण्यासाठी मखाणे बर्फी ही मिठाई पौष्टिक आहे. ती खाल्ल्याने वजन वाढीचा धोका टळतो.
Image: Google
मखाणे बर्फी कशी करणार?
मखाणे बर्फी करण्यासाठी 1 मोठ्या वाटीभर मखाणे पावडर, तेवढीच वाटी बदाम पावडर, अर्धा कप साखर, पाणी, केशर आणि 1 लिटर दूध, वेलची पावडर आणि थोडं साजूक तूप या सामग्रीची गरज असते.
मखाणे बर्फी करताना आधी बदाम गरम पाण्यात रात्रभर भिजवावेत. कढईत थोडं तूप घालून मखाने परतून घ्यावेत. बादाम पाण्यातून काढून सुकवावेत. कोरडे झाल्यावर त्याची सालं काढावीत. भाजलेले मखाणे मिक्सरमधून बारीक वाटावेत आणि बदामही वेगळे वाटावेत.
Image: Google
दुसऱ्या एका भांड्यात साखर बुडेल इतकं पाणी घालावं. साखरेचा पाक करावा. पाक करतानाच त्यात थोडं केशर घालावं. पाक गोळीबंद होण्याच्या आत त्यात दूध घालावं. ते नीट मिसळून घ्यावं. दूध घातल्यावर गॅसची आच मंद करावी. मिश्रणाला उकळी आली की त्यात मखाणे आणि बदाम पावडर घालावी. मिश्रणात गुठळी राहू नये अशा पध्दतीनं ते नीट हलवून घ्यावं. मिश्रण एकजीव झालं की गॅसची आच पुन्हा वाढवून मिश्रण सतत परतत राहावं. पाच मिनिटं मिश्रण परतावं. त्यात थोडं तूप घालावं. तूप घालून मिश्रण पुन्हा 5 मिनिटं परतावं .
Image: Google
मिश्रण एकजीव होवून त्याचा गोळा तयार होतो. डिशला तूप लावावं. मिश्रणाचा गोळा ताटात घालून तो गोल करुन हातानं किंवा उलथण्यानं थापावा. मिश्रण थंडं झालं की त्याच्या वड्या कापाव्यात.
ही बर्फी पचायला जड नसते. पौष्ट्क असते. जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा मखाना बर्फी खाऊन पूर्ण केल्यास हे काय आपण वजन वाढीला आमंत्रण दिलं असं अजिबात वाटणार नाही. मखाना बर्फी करताना बदाम पावडरऐवजी पिस्ता पावडर/ काजू पावडर/ भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट/ कणिक यांचा वापर केला तरी चालतो. साजूक तूप वापरणंही ऐच्छिक आहे. तुपाशिवायही बर्फी छान होते.