सध्या हिवाळ्यात मेथी आणि मटार बाजारात सहज उपलब्ध असतात. मेथी आणि मटार आपल्या शरीरासाठी पौष्टिक तत्वे देतात. त्यामुळे तज्ज्ञांकडून मेथी आणि मटार खाण्याचा सल्ला दिला जातो. मेथी आणि मटारची भाजी, पराठे यासह विविध पदार्थ आपण खाल्ले असतील. मात्र, आपण कधी मेथी - मटार मलाई हा पदार्थ खाल्ला आहे का? हा पदार्थ बनवायला सोपा, चवीला उत्तम, चमचमीत आणि क्रिमी लागतो. चला तर मग या गुलाबी थंडीत या मलाईदार पदार्थाची कृती जाणून घेऊयात.
मेथी - मटार मलाई या रेसिपीसाठी लागणारं साहित्य
१ वाटी हिरवे मटार
१ मेथीची जुडी
४ हिरवी मिरच्या
एक टोमॅटो
२ चमचे साखर
२ चमचे क्रीम
१ कप दूध
थोडी हळद
थोडा गरम मसाला
१२ ते १५ काजू
१०० ग्रॅम खवा
पाव वाटी खरबूज बी
४ चमचे तेल
४ लवंग
४ छोटे वेलदोडे
४ काळे मिरे
तमालपत्र
आलं लसणाची पेस्ट
कृती
सर्वप्रथम, काजू आणि खरबूज बी एक तास गरम पाण्यात भिजवून वाटण करून घ्या. नंतर मटार उकडून घ्यावेत. मेथी साफ करून निवडून बारीक चिरून स्वच्छ करावे. त्यानंतर कढईत तेल टाकून लवंग, वेलदोडे, तमालपत्र, काळीमिरी आणि आले-लसणाची पेस्ट टाकून परतावे. यात १०० ग्रॅम खवा टाकून व्यवस्थित मिक्स करावे.
एक ग्लास पाणी, काजू-खरबूज पेस्ट आणि एक कप दूध घालावे. १०-१५ मिनिटे सतत हलवत शिजवावे म्हणजे मिश्रण फाटणार नाही. चांगले उकळ्ल्यावर चवीनुसार त्यात मीठ टाकावे. मंद आचेवर अर्धा तास शिजवावे. काजू ग्रेवी तयार होईल. दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात जिरं, हळद, टोमॅटो पेस्ट, थोडा गरम मसाला, मटार, मेथी घालून हलवावे.
या मिश्रणात काजू ग्रेव्ही घालून ५-१० मिनिटे शिजवावे. शेवटी दोन चमचे क्रीम घालावे. अशा प्रकारे क्रिमी मेथी - मटार मलाई रेसिपी खाण्यासाठी रेडी.