Join us  

घरच्याघरी परफेक्ट बिर्याणी बनवायची आहे? घ्या ५ टिप्स आणि परफेक्ट मसाला रेसिपी, ऑथेंटिक चव नक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2022 6:10 PM

Hotel Style Perfect Biryani Recipe : बिर्याणी हॉटेलसारखी घरी करता येत नाही असं कोण म्हणतं? ही घ्या रेसिपी

कुठलीही पार्टी असो ती बिर्याणी शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. बिर्याणी म्हटलं की घरातील लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. लग्न, पार्ट्या, सण, वाढदिवस प्रसंग कुठलाही असला तरी प्रत्येक प्रसंगात परफेक्ट डिश म्हणून बिर्याणीने आपली स्वतःची अशी जागा निर्माण केली आहे. बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये गेल्यावर बिर्याणी ऑर्डर करतो परंतु हीच बिर्याणी घरी बनवावी आणि मनमुरादपणे त्याचा आनंद घेत घेत खावी अशी बऱ्याच लोकांची ईच्छा असते. पण बरेच प्रयत्न करूनही रेडिमेड हॉटेल स्टाईल बिर्याणीसारखी चव घरच्या बिर्याणीला येत नाही. ते जमावं म्हणून या काही टिप्स (Hotel Style Perfect Biryani Recipe).

परफेक्ट हॉटेल स्टाईल बिर्याणीसाठी

१. तांदुळाची निवड - तांदूळ हा बिर्याणी मधील सर्वात महत्वाचा घटक आहे. हॉटेल स्टाईल बिर्याणी बनविण्यासाठी उत्तम दर्जाचा लांब बासमती तांदूळ घेणे आवश्यक आहे. तांदूळ शिजवताना तो ५०% ते ६०% शिजवून घ्या. जास्त शिजवला तर तो मोडतो, भाताची शीतं लांब दिसणार नाहीत. 

२. चांगल्या प्रतीचा खडा मसाला - बिर्याणीमध्ये चांगल्या प्रतीचे खडे मसाले वापरल्यास बिर्याणीला उत्तम चव येते. दालचिनी, तमाल पत्र, लवंग, वेलदोडे, काळीमिरी, लाल मिरची पावडर, वेलची, गरम मसाला यांसारख्या खडा मसाल्यांचा वापर करावा. 

३. कोळश्याचा दम - बिर्याणी तयार झाल्यावर सगळ्यात शेवटी एका छोट्या वाटीत गरम कोळश्याचा तुकडा घेऊन त्यावर गरमागरम तुपाची धार सोडा. आणि ही वाटी बिर्याणीच्या पातेल्यात ठेवून त्यावर झाकण ठेवा. त्या कोळश्याचा दम संपूर्ण बिर्याणीला लागेपर्यंत २ मिनिटं वाट पाहा. अश्याप्रकारे दम दिल्यावर बिर्याणीला उत्तम चव येते. 

४. बिर्याणीचा थर लावताना - बिर्याणीचा थर तुम्ही जितक्या योग्य पद्धतीने लावाल तितकीच ती दिसायला आकर्षक व चविष्ट लागेल. पातेल्याच्या तळाला शिजवून घेतलेल्या मिक्स भाज्यांचा एक थर द्यावा. त्यावर शिजलेल्या भाताचा दुसरा थर द्यावा. मग आपल्या आवडीनुसार इसेन्सचे काही थेंब शिंपडावे. त्यावर पुदिना, तळलेला कांदा, कोथिंबीर यांचा थर पसरून घ्यावा. केशर पाणी शिंपडून घ्यावे. मग परत एक भाताचा थर पसरवून त्यावर थोडासा बिर्याणी मसाला भुरभुरुन घ्यावा. सगळ्यात शेवटी तळलेला कांदा व २ चमचे तूप घालून त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर बिर्याणी गरम करून घ्यावी.   

असा बनवा बिर्याणी मसाला .... 

साहित्य: ३ ते ४ लाल सुक्या मिरच्या, ३ ते ४ तमालपत्र, २ मोठे चमचे धणे, २ मोठे चमचे शहाजिरे, २ इंच दालचिनी, १ जायफळ,१ चमचा लवंग, २ मोठी वेलची, ४ छोटी वेलची, १ चमचा काळीमिरी, १  चमचा बडीशेप, १ चमचा हळद, ३ दगडफूल, १ चमचा ओवा. 

कृती : 

१. वरील दिलेले खडे मसाले एका कढईत एकत्रित करून मंद आचेवर भाजून घ्यावे. २. भाजून झाल्यावर ते एका ताटात काढून पूर्ण थंड करून घ्या. ३. मसाले थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये बारीक पूड होईपर्यंत दळून घ्यावेत. ४. या मसाल्यात जायफळ किसून घालावे व एका हवाबंद डब्यात हा मसाला ठेवल्यास वर्षानुवर्षे मसाला टिकतो.  

हा मसाला घालून बिर्याणी बनविली तर घरच्याघरी परफेक्ट हॉटेल स्टाइल उत्तम बिर्याणी झटपट तयार.

टॅग्स :अन्नपाककृती