गरमागरम सामोसा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत. संध्याकाळच्या चहासोबत गरमागरम सामोसा खाण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. सामोसा ही अशी डिश आहे की जी आपण स्नॅक्स किंवा नाश्ता म्हणून आवडीने खातो. सामोसा हा भारतातील अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. मसाल्यांमध्ये मिसळलेल्या बटाट्याच्या भाजीने भरलेला चवदार समोसा तर आपण बहुतेक वेळा खातोच.
समोसा आवडत नाही असा व्यक्ती शोधणे अवघड आहे. भारतात प्रत्येक राज्यात चहासोबत किंवा चटणीसोबत समोसा खाल्ला जातो. समोसा हा शेकडो वर्षांपासून भारतीय खाद्य संस्कृतीचा भाग आहे. कोणताही उत्सव, विशेष सोहळा त्याशिवाय अपूर्ण आहे. समोस्यांमध्ये देखील आता वेगवेगळ्या प्रकारचे सामोसे बाजारांत उपलब्ध दिसतात. या विकेंडला घरच्या घरी पिझ्झा स्टफ ब्रेड सामोसा करून तर पहा(Weekend Special : Pizza Stuff Bread Samosa).
साहित्य :-
१. लाल ढोबळी मिरची - १ टेबलस्पून (छोट्या चौकोनी आकारातील तुकडे)
२. हिरवी ढोबळी मिरची - १ टेबलस्पून (छोट्या चौकोनी आकारातील तुकडे)
३. पिवळी ढोबळी मिरची - १ टेबलस्पून (छोट्या चौकोनी आकारातील तुकडे)
४. पनीर - १ टेबलस्पून (छोट्या चौकोनी आकारातील तुकडे)
५. मीठ - चवीनुसार
६. चिलीफ्लेक्स - १/२ टेबलस्पून
७. ओरेगॅनो - १/२ टेबलस्पून
८. लसूण पावडर - १/२ टेबलस्पून
९. पिझ्झा - पास्ता सॉस - १ टेबलस्पून
१०. ब्रेड स्लाइस - ८ ते १०
११. पाणी - गरजेनुसार
१२. तेल - तळण्यासाठी
१३. चीज - १ टेबलस्पून (किसून घेतलेले)
thenoshytales या इंस्टाग्राम पेजवरून पिझ्झा स्टफ ब्रेड सामोसा कसा तयार करायचा याचे साहित्य व कृती शेअर करण्यात आले आहे.
कृती :-
१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये तिन्ही रंगाच्या बारीक चिरलेल्या ढोबळी मिरची व पनीरचे तुकडे, किसून घेतलेले चीज घालून घ्यावे.
२. त्यानंतर मीठ, चिलीफ्लेक्स, ओरेगॅनो, लसूण पावडर, पिझ्झा - पास्ता सॉस घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे.
३. आता एक ब्रेड स्लाइस घेऊन तो लाटणीच्या मदतीने पातळ लाटून घ्यावा.
४. पातळ लाटून घेतल्यानंतर ब्रेडच्या कडा सुरीने कापून घ्याव्यात. आता या ब्रेडचे चारही कोपरे कापून घ्यावेत.
५. आता या ब्रेडचे मधोमध दोन भाग असे करा की तुम्हांला दोन त्रिकोण मिळतील. (सँडविच जसे त्रिकोणी आकारात करून घेतो तसे)
६. आता ब्रेडचा एक त्रिकोणी आकार घेऊन त्याला कोनासारखा आकार देऊन सामोसा तयार करून घ्यावा.
७. त्यानंतर आपण तयार करून घेतलेले सारण भरावे.
८. आता सारण भरून घेतल्यानंतर ब्रेडच्या कडांना थोडेसे पाणी लावून ते एकमेकांना चिकटवून सामोसा तयार करून घ्यावा.
९. आता हे तयार झालेले समोसे तुमच्या आवडीनुसार गोल्डन ब्राऊन रंग येइपर्यंत तेलात तळून घ्यावेत.
तुमचा पिझ्झा स्टफ ब्रेड समोसा खाण्यासाठी तयार आहे.