Join us  

वीकेंड स्पेशल : सोया ६५, असा मसालेदार - चटकदार पदार्थ, आठवडा होईल यादगार - पाहा मस्त रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2023 12:17 PM

Weekend Special : Soya 65 : Recipe : संध्याकाळी गरमागरम चहासोबत हे मसालेदार सोया ६५ खाण्याची मज्जाच न्यारी आहे.

छोट्या आकाराने गोल असणाऱ्या सोया चंक्सचा आपण आपल्या आहारात समावेश करतो. सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन, फायबर आणि अनेक पोषक गुणधर्म असतात. सोयाबीन पासून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करु शकतो. सोयाबीन मसाला, सोयाबीन कटलेट्स, सोयाबीन भाजी असे अनेक झटपट तयार होणारे पदार्थ आपण सोयाबीन पासून तयार करु शकतो. आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांना बळकटी मिळते, कोलेस्ट्रॉल कमी होते, पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. यासाठी आहारात सोयाबीनचा वापर करणे खूप गरजेचे आहे. सोयाबीनपासून आपण चमचमीत, चटकदार झटपट होणारी सोया ६५ ही डिश नक्की घरी ट्राय करु शकतो. संध्याकाळी गरमागरम चहासोबत हे मसालेदार सोया ६५ खाण्याची मज्जाच न्यारी आहे. या वीकेंडला घरच्या घरी सोयाबीन पासून झटपट तयार होणारी ही कुरकुरीत, मसालेदार सोया ६५ रेसिपी नक्की ट्राय करून पाहाच(Weekend Special : Soya 65 : Recipe).

साहित्य :- 

१. सोया चंक्स - २ कप २. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ३. हळद - १ टेबलस्पून ४. गरम मसाला - १ टेबलस्पून ५. धणे पावडर - १ टेबलस्पून ६. लसूण - ४ ते ५ (बारीक कापून घेतलेली)७. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)८. दही - २ ते ३ टेबलस्पून ९. मैदा - ३ टेबलस्पून १०. कॉर्नफ्लॉवर - ३ टेबलस्पून११. तेल - तळण्यासाठी 

फोडणीसाठी :- १. कढीपत्ता -  ८ ते १० पाने २. मोहरी - १ टेबलस्पून ३. हिरवी मिरची - ४ ते ५ (उभी चिरून घेतलेली)  ४. तेल - २ ते ३ टेबलस्पून

 

कृती :- १. सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सोया चंक्स घालून ते गरम पाण्यातून ७ ते ८ मिनिटे उकळवून घ्यावेत.२. उकळवून घेतल्यानंतर थोडे थंड झाल्यावर सोया चंक्स हातांनी दाबून त्यातील पाणी काढून ते संपूर्ण कोरडे करून घ्यावेत. 

३. पाण्याचा अंश काढून टाकलेले सोया चंक्स एका डिशमध्ये काढून घ्यावेत. ४. आता त्यात लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, धणे पावडर, दही, बारीक चिरून घेतलेली लसूण, कोथिंबीर घालून हे सर्व हाताने एकजीव करुन घ्यावे. 

५. त्यानंतर त्यात मैदा, कॉर्नफ्लॉवर घालून सोया चंक्स कोट करून घ्यावेत.   ६. एका कढईत पुरेसे तेल घेऊन हे सोया चंक्स तेलात डिप फ्राय तळून घ्यावेत.७. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता यांची फोडणी द्यावी. ८. फोडणी दिल्यानंतर तळून घेतलेले सोया चंक्स त्यात घालावेत. हे तयार झालेले सोया चंक्स चमच्याने ढवळून घ्यावेत. 

तयार झालेले सोया ६५ सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

टॅग्स :पाककृतीअन्न