दही आरोग्यासाठी चांगेल की वाईट हा वाद मागील बऱ्याच काळापासून आहे. पण दही खूप आवडतं त्यामुळे त्याशिवाय जेवणच पूर्ण होत नाही असे म्हणणारे अनेक जण आपल्या आजुबाजूला असतात. जेवणात दही असेल तर पोटाला शांत वाटते, दह्यामुळे जेवणाचा स्वाद वाढण्यास मदत होत असल्याचे म्हणत अनेक जण रोजच्या जेवणात दह्यावर ताव मारतात (Diet Tips). दह्यात प्रोटीन, कॅल्शियम व्हीटॅमिन बी ६, बी १२, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, कॉपर, सेलेनियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फॅटी ऍसिडस् असे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त घटक असतात. (Monsoon Special) त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले असते असे मॉडर्न सायन्स म्हणते. आहारशास्त्राचे काही नियम असतात, ऋतूनुसार हे नियम बदलतात, ते माहिती असायला हवेत (What about Consuming Curd in Rainy Season).
उन्हाळ्याच्या दिवसांत गारेगार दही आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी पावसाळ्यात मात्र दही खावे की नाही याबाबत अनेकांना साशंकता असते. आयुर्वेदानुसार दही पचायला जड असते त्यामुळे रात्री झोपायच्या वेळेला शक्यतो दही खाऊ नयेत. तसेच खूप आंबट, जुने झालेले दही पावसाळ्याच्या दिवसांत खाऊ नये. पावसाळ्यात पचनशक्ती क्षीण झालेली असते अशावेळी दही बेतानेच खायला हवे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दही खायचेच असेल तर कमी प्रमाणात तेही साखर, मध किंवा तूप घालून खावे म्हणजे ते पचायला सोपे होते. तसेच ज्यांना ताप, सर्दी आहे त्यांनी शक्यतो या काळात दही टाळलेले चांगले.
पावसाळ्याच्या दिवसांत डायरीया, जुलाब अशाप्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. पोटाच्या तक्रारींवर दही हा अतिशय उत्तम उपाय असून दह्यातील बॅक्टेरीया बिघडलेले पोट पूर्वस्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे पोट बिघडल्यावर दही-भात खाण्याचा सल्ला दिला जातो. दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते त्यामुळे हाडे आणि दात यांच्या आरोग्यासाठी दही चांगले असते. दह्याऐवजी ताक पिणे केव्हाही फायद्याचे, त्यामुळे दिवसा ताक प्यायला हरकत नाही. मात्र ते जास्त आंबट आणि गार नसावे.